पोलीस कोठडीचा अभाव; सोयीसुविधा नसल्याने नवीन जागेत स्थलांतराची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या वर्तणुकीबाबत बरेच वादळ उठलेले असताना दुसरीकडे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ यासाठी तत्पर असलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सानपाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा मात्र कोंडमारा झाल्याचे चित्र आहे. कारण या पोलीस कार्यालयाचा कारभार हा अपुऱ्या जागेतच सुरू असून त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सानपाडा सेक्टर आठ येथील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाच्या कोपऱ्यातील पदपथावरच सानपाडा पोलीस ठाणे आहे. अपुऱ्या जागेमुळे येथील कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पत्र्याच्या शेडमध्ये दाटीवाटीने येथील पोलीस कर्मचारी काम करतात. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बसण्यासाठी पोलीस ठाण्याला लागूनच छोटी केबिन आहे. तर या पोलीस ठाण्यात ७०पेक्षा अधिक कर्मचारी असून आठ महिला पोलीसांचादेखील समावेश आहे. मात्र त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे बाहेरील सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापरच येथील कर्मचाऱ्यांना करावा लागतो. याशिवाय एखाद्या गुन्ह्य़ामध्ये जर आरोपीला अटक केली तर त्याला ठेवण्यासाठी पोलीस कोठडीही येथे नाही. त्यामुळे तुर्भे किंवा इतर पोलीस ठाण्यात जागा उपलब्ध असल्यास त्या ठिकाणच्या पोलीस कोठडीत आरोपीला ठेवण्यात येते. त्याचबरोबर पोलीस ठाण्याशी संबंधित पासपोर्ट व इतर कामे करतानादेखील या अपुऱ्या जागेमुळे अडचणी येत असून त्याचा त्रास नागरिकांनाही होत आहे. या पोलीस ठाण्यातील कार्यालयीन कामांची सर्व गोपनीय कागदपत्रे ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे उद्यानाच्या लगत असलेल्या पत्र्याच्या दोन बैठय़ा खोल्यांमध्ये या ठाण्याचा गोपनीय कामांचा कारभार चालतो. तसेच विविध गुन्ह्य़ांमध्ये पकडलेली वाहनेदेखील पालिकेच्या मैदानातच ठेवली जात असल्याने त्याचा त्रासही येथील नागरिकांना होत आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे लवकरात लवकर नवीन जागेत स्थलांतर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लालफितीचा अडथळा

सानपाडय़ाच्या नवीन पोलीस ठाण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून सानपाडा पामबीच जवळील मोराज सर्कल येथील सेक्टर १३ भूखंड क्रमांक १ येथे नवीन पोलीस ठाणे होणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होण्याची आवश्यकता आहे; परंतु सरकारी कामाला लालफितीच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याने पोलीस ठाण्याच्या कामात तरी विलंब होऊ  नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सानपाडा पोलीस ठाण्यासाठी नवीन जागा निश्चित झाली आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पोलीस ठाणे उभारावे, यासाठी आयुक्तालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या पोलीस ठाण्याच्या जागेत नक्कीच अडचणी येत आहेत. याबाबत प्रशासनाला कळविण्यात आलेले आहे.

सूरज पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सानपाडा

सानपाडा पोलीस ठाण्याची जागा नक्कीच अपुरी आहे. या पोलीस ठाण्याचे स्थलांतर नवीन जागेत करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे सरकारदरबारी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

डॉ. सुधाकर पाठारे, उपायुक्त, परिमंडळ १

मैदानालगत असलेल्या पदपथावर पोलीस ठाणे सुरू आहे. परिसरातील नागरिकांच्या कायदा सुव्यवस्थेसाठी सानपाडा पोलीस सदैव कार्यरत असतात; परंतु अपुऱ्या जागेच्या अडचणी पाहता प्रशासनाने हस्तक्षेप करून नवीन व प्रशस्त जागेत या पोलीस ठाण्याचे स्थलांतर करावे.

सुरेश मढवी, रहिवासी, सानपाडा.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of facilities to sanpada police
First published on: 11-11-2017 at 00:43 IST