खासगी दवाखान्यांतील महागडय़ा उपचारांचा शेतकऱ्यांना भुर्दंड
सीमा भोईर नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील तीन पशुवैद्यकीय चिकित्सालयांतील पशुधन पर्यवेक्षक पदे बऱ्याच काळापासून रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना व दुग्धव्यवसाय करणाऱ्या स्थानिकांना खाजगी चिकित्सालयाचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यात वेळ व पैशांचा अपव्यय होत आहे.
पनवेल तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या घटू लागली असली, तरीही स्थानिक पातळीवर शेती व दुग्धव्यवसायासाठी पशुपालन करणारे अनेक आहेत. शेती लहान असल्याने ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. या पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात व ग्रामीण भागात पशुवैद्यकीय चिकित्सालयाची निर्मिती करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यात एकूण सात चिकित्सायलये आहेत, मात्र त्यातील तीन चिकित्सालयांतील पशुधन पर्यवेक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे स्थानिक नागरिकांना खासगी चिकित्सालयांचा पर्याय निवडावा लागत आहे.
पनवेल तालुक्यातील वावंजे व तळोजे येथील पशुधन पर्यवेक्षक पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असून गुलसुंदे येथील पद महिन्यापासून रिक्त आहे.
ही रिक्त पदे भरण्याबाबत पशुसंवर्धन विभाग उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे. सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांना नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सेवा द्यावी लागते. त्यांना स्वतंत्रपणे पशुसेवेचा अधिकार नाही. शासनस्तरावरून पशुवैद्यकीय दवाखान्यांत औषधपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पशुपालकांना आपले पाळीव प्राणी खासगी दवाखान्यात न्यावे लागतात. त्याचा मोठा भुर्दंड भरावा लागत आहे.
पदे रिक्त असल्याने आम्ही अतिरिक्त ताबा इतर पशुधन पर्यवेक्षकांना दिला आहे, १५ मेनंतर रिक्त पदे भरण्यात येतील, अशी माहिती डॉ. वाय. सी. पठाण यांनी दिली.
चिकित्सालयांत पशुधन पर्यवेक्षकच नसल्याने वाईट अवस्था झाली आहे. अतिरिक्त ताबा दिलेले डॉक्टर अनेकदा चिकित्सालयात येतच नाहीत. त्यामुळे आम्हाला खाजगी चिकित्सालयात जावे लागते.
– अशोक पाटील, पशुपालक
पदे रिक्त असल्याने आम्ही अतिरिक्त ताबा इतर पशुधन पर्यवेक्षकांना दिला आहे, १५ मेनंतर रिक्त पदे भरण्यात येतील.
– डॉ. वाय. सी. पठाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी