नवी मुंबई : सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत शनिवारी होणार असे जाहीर केले होते. मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोने सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी सोडतीची रंगीत तालिम सुद्धा सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल यांच्यासमोर तळोजा येथे घेण्यात आली होती. सर्व तयारी झाली असताना सुद्धा अचानक सोडत पुढे ढकलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

२४ ऑक्टोबर २०२४ ला दस-याच्या मुहूर्तावर सिडकोने २६ हजार घरांची ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत सोडत प्रक्रिया सुरू केली. तब्बल १ लाख ६० हजार नागरीकांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते. मात्र कागदपत्र जमा केल्यानंतर घरांच्या किंमती जाहीर करण्यासाठी दोन महिन्यांचा काळ लावला. त्यानंतर २५ लाख ते १ कोटी ५ लाखांपर्यंतच्या घरांच्या किमती जाहीर केल्या. आर्थिक दुर्बल घटक आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना या किमती परवडणा-या नसल्याने १ लाख नागरिकांनी अर्जाचे शुल्क भरणे पसंत केले नाही. उरलेल्या ६० हजार अर्जदारांपैकी अवघ्या २१ हजार ५०० अर्जदारांनीच अर्ज शुल्कासह अनामत रक्कम भरली. तब्बल १ लाख ३८ हजार ५०० अर्जदारांनी या सोडतीला पाठ दाखविले. सोडत प्रक्रियेसाठी तब्बल चार महिन्यांचा काळ लागल्याने सिडकोच्या कारभाराविषयी अर्जदारांची नाराजी वाढू लागली.

सिडकोने शनिवारी सोडतीचा कार्यक्रम तळोजा वसाहतीमधील फेज १, येथील सेक्टर २८ येथील रायगड इस्टेट येथे आयोजित केला होता. तीनशे अर्जदार बसतील असे नियोजन सिडकोने कार्यक्रमासाठी पूर्ण केले होते. मात्र हे नियोजन बारगळले. सोडत प्रक्रिया नेमकी कोणत्या कारणासाठी पुढे ढकलली याची अद्यापतरी माहिती सिडकोने दिली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.