बारावीत संपूर्ण जिल्ह्यात ८८ टक्के, तर नवी मुंबईत ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्यतून ८८.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील एकूण उत्तीर्णाच्या सरासरीपेक्षा (८९.५) ठाणे जिल्ह्याची सरासरी काहीशी कमी असली तरी नवी मुंबई शहराचा निकाल जिल्ह्यत सर्वाधिक अर्थात ९२.३५ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यतील ८९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी तीन शाखांमधून ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ७९ हजार सात हजार ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून नवी मुंबईचा निकाल सर्वाधिक ९२.३५ टक्के एवढा लागला आहे. या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून तब्बल ९५.०५ टक्के विद्यार्थिनी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या ८९ हजार ९२४ विद्यार्थ्यांमध्ये ४७ हजार १७६ मुले तर ४२ हजार ७४८ मुलीचा समावेश होता. त्यापैकी ३९ हजार ६६१ मुली तर ४० हजार ७७ मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.९५ टक्के इतकी आहे. दरम्यान, विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९२.८९ टक्के इतका लागला असून वाणिज्य शाखा ८९.५० तर कला शाखेची (७८.५३ टक्के ) टक्केवारी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही घसरली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातून एकूण १६ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, भिवंडी या भागातील निकालाची टक्केवारी जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांच्या तुलनेत अधिक आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून यंदा बारावीच्या परीक्षेस १४ हजार ६०८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १३ हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.०५टक्के इतके असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.१५ टक्के इतकी आहे.
या वर्षी ठाणे जिल्ह्य़ातून वाणिज्य शाखेत ४६ हजार ४१९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ४१ हजार ५४३ (८९.५० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत २७ हजार १२८ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार १९८ (९२.८९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरातील २० हजार १२६ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ४४५ (८६.६८ टक्के)विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
२१ वर्षांनी गीता अहिरे उत्तीर्ण
ठाण्यातील गीता अहिरे यांनी तब्बल २१ वर्षांनी बारावीची परीक्षा देत ६२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. लग्न झाल्यामुळे गीता अहिरे यांना दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या गीता यांनी यंदा परीक्षा दिली आणि या परीक्षेत त्यांनी स्वबळावर यश मिळवले. गीता अहिरे यांच्या शिक्षणासाठी त्यांचे पती आणि कुटुंबियांनीही सहकार्य केले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
कला शाखेची घसरण सुरूच.
गेल्या काही वर्षांपासून कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असले तरी कला शाखेचा निकाल केवळ ७८.५३ टक्के एवढा लागला आहे. यंदा संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातून १५ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी कला शाखेतून बारावी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ १२ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.‘कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर केवळ पदवी हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे, असा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये रूढ आहे. त्यामुळे गुणांची स्पर्धा न करता कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा कल हा केवळ उत्तीर्ण होण्याकडे असतो. त्यामुळे ही टक्केवारी घसरू लागली आहे’, अशी प्रतिक्रिया सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.डी. मराठे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.