माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आमदार नरेंद्र पाटील यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील घरहीन माथाडी कामगारांना घरे मिळणार आणि कोपरखैरणे भागात असलेल्या हजारो माथाडी कामगारांची घरे पालिका कारवाईतून वाचणार या दोन आशेवर हजारो माथाडी कामगार भाजपमध्ये सामील होण्यास तयार असल्याची चर्चा आहे. माथाडी कामगारांची बलाढय़ संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस आमदार नरेंद्र पाटील यांची पावले त्यामुळेच भाजपच्या दिशेने पडू लागली आहेत. पाटील यांचा राग आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यावर असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर माथाडी कामगारांवर वचपा काढल्याची टीका पाटील यांनी रविवारी केली.

माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमदार नरेंद्र पाटील यांनी रविवारी कधी येऊ पक्षात अशी विचारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पाटील यांनी रविवारी अण्णासाहेबांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यास हजारो माथाडी कामगार उपस्थित होते. राज्यात विविध कार्यक्षेत्रांत कार्यरत असलेले पाच लाख माथाडी कामगार असून जनरल कामगार संघटनेचे एक लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत. या कष्टकरी कामगारांना सवलतीच्या  दरात घरे मिळावीत यासाठी संघटना गेली अनेक वर्षे शासनाबरोबर संघर्ष करीत आहे. मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतरित झालेल्या या कामगारांना तुर्भे, कोपरखैरणे, नेरुळ परिसरात राज्य शासनाने दहा हजारांपेक्षा जास्त घरे दिलेली आहेत, मात्र अद्याप हजारो माथाडी कामगार घरांपासून वंचित आहेत. वडाळा येथे शासनाने दहा वर्षांपासून दिलेल्या जमिनीचे घोंगडे एफएसआयमुळे भिजत पडले आहे, तर ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, लातूर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्य़ांत माथाडी कामगार सर्वाधिक असताना एकही घरकुल योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सरकार राज्यातील माथाडी कामगारांना घरे देईल या आशेपोटी नवी मुंबईतील हजारो कामगार आशेवर आहेत. मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान घरकुल योजनेंर्तगत अशी घरे दिली जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. घर या एका आशेवर माथाडी कामगार सरकारच्या सोबत जाण्यास तयार असल्याची चर्चा आहे. माथाडी कामगारांच्या महसूल व नगरविकास विभागाकडे १७ मागण्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यांचा पाठपुरावा करूनही सरकार लक्ष देत नसल्याने माथाडी कामगार नाराज असून आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनी माथाडी कामगारांना वेळोवेळी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यात कराड लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्करावा लागलेला पराभव हा केवळ माथाडी कामगारांमुळे असल्याने त्यांनी मुख्यमंत्री काळात माथाडी कामगारांचा एकही प्रश्न सोडविला नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यामुळे माथाडी कामगारांचे प्रश्न  सोडविण्यासाठी भाजपच काय कोणत्याही पक्षात जाण्याची तयारी असल्याचे काही माथाडी कामगारांचे मत आहे.

बेकायदा घरे नियमित करण्याची आशा

नवीन घरांच्या या अपेक्षेबरोबरच कोपरखैरणे, तुर्भे, नेरुळ येथे माथाडी कामगारांनीो बेकायदेशीर बांधकामे मोठय़ा प्रमाणात केलेली आहेत. पावसाळ्यानंतर पालिका या घरांवर कारवाई करणार असल्याची चर्चा आहे. पाालिकेने १९ हजार घरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात या घरांचा समावेश आहे. ह्य़ा घरांवर कारवाई झाल्यास माथाडी कामगारांवर फार मोठा फटका बसणार असून उदरनिर्वाहाचे एक साधन जाणार आहे. त्यामुळे ह्य़ा घरांवर कारवाई करण्यापासून केवळ मुख्यमंत्री स्थगिती देऊ शकणार असल्याने भाजपच्या आडोशाला जाण्याची तयारी माथाडी कामगारांनी दाखविली आहे.

विकास महाडिक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mathadi workers coming close to bjp
First published on: 27-09-2016 at 03:53 IST