नवी मुंबई : मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी (२४ ऑगस्ट) देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ठाणे ते वाशी/नेरुळ या दरम्यान रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात अप व डाऊन अशा सर्व गाड्या रद्द राहतील. ठाणे स्थानकावरून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत सुटणाऱ्या गाड्या धावणार नाहीत. तसेच वाशी/नेरुळ/पनवेलवरून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्याही सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
हार्बर, उरण व पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यामुळे या मार्गावरील गाड्यांमध्ये अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे.
रविवारी गणपतीच्या खरेदीनिमित्त, बाजारहाट करण्याकरिता किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना या ब्लॉकचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्या किंवा वाशीवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या हे पर्याय प्रवाशांसाठी खुले आहेत.
देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मात्र, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.