नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या घणसोली सेक्टर १६ मधील स्मशानभूमीत वीज पुरवठा खंडित झाल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना अंधारातच विधी पार पाडावा लागला. अंत्यविधीच्या वेळी स्मशानात काळोख असल्याने अखेर चारचाकी गाड्यांच्या हेडलाईटच्या उजेडातच अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट पसरली असून, महापालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे तब्बल ६ हजार कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असतानाही नागरिकांना अशा संवेदनशील क्षणी मूलभूत सुविधांचा अभाव भासतो आहे. “एका बाजूला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडतो, मात्र ज्या ठिकाणी नागरी सुविधांवर लक्ष द्यायला हवे त्या ठिकाणी मनपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” अशी टीका मनसेचे रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे यांनी केली आहे.
घणसोली स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद पडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना आणि नागरिकांना मोबाईल फ्लॅशलाइट आणि गाडीच्या हेडलाईटच्या उजेडातच विधी पार पाडावा लागला. यामुळे उपस्थितांना केवळ भावनिक त्रासच नव्हे तर स्मशान परिसरात असुरक्षिततेची भावनाही उपस्थितांमध्ये निर्माण झाली होती.
त्यामुळे स्मशानभूमीसारख्या ठिकाणी विजेची पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक आहे. हे ठिकाण दिवसरात्र वापरले जाते, त्यामुळे प्रत्येक स्मशानभूमीत विद्युत जनित्राची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या घटनेनंतर मनसेचे संदीप गलगुडे यांनी महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमीत कायमस्वरूपी जनरेटर बसवण्याची मागणी नवी मुंबई महापालिकेकडे केली आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून रीतसर निवेदन देणार असल्याचे गलुगडे यांनी सांगितले आहे.
स्थानिक नागरिकांनीही मनपाच्या दुर्लक्षाचा निषेध करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर मनपा प्रशासनाने स्मशानभूमीतील विजेच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
