नवी मुंबई : पनवेल जेएनपीटी महामार्गावर गव्हाणफाटा येथे सिडको महामंडळाच्या शंभर एकर जमिनीचा ताबा सध्या कंटेनर यार्डचालक, धाबे व हॉटेल चालक तसेच गॅरेज मालकांकडे आहे. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या जमिनीकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे जोरदार अवैध व्यवसाय सुरू आहेत. सिडकोने त्यांच्या मालकीच्या जमिनीसमोर फलक लावून संबंधित जागेवर कुंपण घातल्यास या गैरधंद्यावर आळा बसेल.

सिडको मंडळाचे अतिक्रमणविरोधी पथक सध्या नवी मुंबईतील विविध उपनगरातील अनधिकृत बांधकामे निष्काषित करण्यात गुंतले आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने सिडकोची हजारो एकर जमिनीवर लक्ष ठेवणे अतिक्रमन विभागाला अशक्य झाले आहे. त्यामुळे सिडकोच्या याच उणीवांचा फायदा उचलत काही गैरधंदे करणाऱ्यांनी पनवेल जेएनपीटी महामार्गालगत सिडकोची जागा कंटेनर गोदाम मालक, हॉटेल आणि धाबे मालकांना भाड्याने देण्याचा धंदा सुरू केला आहे. गव्हाण फाटा (मौजे वहाळ) येथील शंभर एकर पेक्षा मोठे सिडको क्षेत्राचा वापर कंटेनरची उलाढाल करण्यासाठी होत आहे. सिडकोच्या करोडो रुपयांचा मालकीच्या जागेवर सिडकोने साधे फलक सुद्धा लावलेले नाही. सिडकोच्या मालकीच्या जागेवर अद्याप कुंपणसुद्धा घातलेले नाही. जागा सिडकोच्या मालकीची आणि कंटेनरची उलाढाल करणाऱ्या गोदाम मालकांकडून भाडे घेणाऱ्यांची टोळी या परिसरात सक्रिय आहे.

सिडकोच्या अतिक्रमण विभागाने दोन वर्षांपूर्वी मौजे वहाळ सर्वे नंबर ४३६ जागेवरील १५ एकर जागेचा वापर करणाऱ्या व्ही.एम.पी. कंटेनर यार्डतर्फे विकी गौंड यांना नोटीस पाठवली. नोटीसीनंतर संबंधित यार्डमधील १० कंटेनर फोडून सिडकोने कार्यवाही केली. परंतु पुन्हा हे कंटेनर यार्ड सुरूच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिडको महामंडळाच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने सिडकोच्या मालकी हक्काच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या बांधकाम धारकांना यापूर्वीच एमआरटीपी कायद्याप्रमाणे नोटीस बजावली आहे. दैनंदिन अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. पनवेल – जेएनपीटी महामार्गालगत अतिक्रमण असल्यास नक्कीच स्थळपाहणी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल. – प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको मंडळ