वाहतूक कोंडीला पर्याय; केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची माहिती
मुंबई तसेच त्यानंतर नवी मुंबईतील रस्ते मार्गातील कोंडीची समस्या पाहता केंद्र सरकारकडून जलमार्गाला प्राधान्य देताना मुंबईपासून ते थेट खारपाडा म्हणजे मुंबई-गोवा अशा ५० किलोमीटर लांबीच्या महामार्गापर्यंत रोप वेची वाहतूक सेवा सुरू करण्याबाबत विचाराधीन आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यासाठी चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यामुळे मुंबईतून प्रवास करण्यासाठी नवीन पद्धतीची वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस या सुविधेतून देण्याचा आहे.
मुंबई ते घारापुरी(एलिफंटा) असा रोप वे मार्ग तयार करून घारापुरी येथे येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना नवी व आनंददायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या मार्गात वाढ करून मुंबई ते खारपाडा या मुंबई गोवा महामार्गाला जोडणाऱ्या मार्गापर्यंत ही सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार रस्ते विकास विभागाकडून केला जात आहे. त्याचे संकेत गडकरी यांनी जेएनपीटीच्या भेटी दरम्यान दिले होते.
पर्यायी मार्गाचा विचार
मुंबईवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. यात जलमार्गाने वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच प्रमाणे शिवडी, न्हावा शेवा सागरी पूल व सागरी महामार्गही प्रस्तावित आहेत. जेएनपीटी बंदराला मुंबई नवी मुंबई तसेच पुणे व गोवाला जोडण्यासाठी सहा ते आठ पदरी रस्ते मार्ग तयार केले जात आहेत. या मार्गावर उड्डाण पुलांचीही उभारणी केली जात आहे. तर दुसरीकडे केवळ उंच भागातून ये-जा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रोप वेचाही प्रवासासाठी उपयोग करता येईल का याचाही विचार रस्ते विकास विभागाकडून केला आहे.