नवी मुंबई : नियोजनबद्ध शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत होता. नवी मुंबई महापालिकेने सिडको वसाहतीमध्ये कंडोमिनियम अंतर्गत कामे करण्याचे २०११ पासून बंद केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईमध्ये सिडको वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडको वसाहतीमध्ये कंडोमिनियम अंतर्गत नागरी सुविधांची कामे नवी मुंबई महापालिकेने करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

नवी मुंबई शहरात बेलापूर ते ऐरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात सिडकोनिर्मित वसाहती असून कंडोमिनियम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या ७० टक्के भागामध्ये येथील रहिवासी राहतात. सिडकोने बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना मूलभूत सुविधा २०११ पासून मिळत नव्हत्या. या भागांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा, रस्त्यावरील दिवे अशा अनेक सुविधा वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या. कारण या भागात जमिनी सिडकोच्या मालकीच्या असून महापालिकेने नागरी सुविधा देण्याची कामे २०११ पासून बंद केली आहेत. सिडकोने ही घरे दिली, पण महापालिकेने त्यांना आवश्यक सुविधा देणे बंद केले. त्यामुळे वस्त्यांमध्ये कोणतीही नागरी कामे झाली नव्हती.

वाशीमध्ये झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात व माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावेळी किशोर पाटकर यांनी ही बाब उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर ७ मे रोजी झालेल्या बैठकीनुसार सिडको वसाहतीमध्ये कंडोमिनियम अंतर्गत नागरी सुविधांची कामे नवी मुंबई महापालिकेने करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

कामांना गती

२०११ नंतर आता १४ वर्षानंतर महापालिकेला सिडको वसाहतीअंतर्गत कामे करावी लागणार आहेत. मागील महिन्यात शासनाकडे झालेल्या बैठकीत महापालिकेने मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात, मल:निसारण आणि पाणीपुरवठा यासंबंधीची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी महापालिकेला दिले होते .त्यामुळे वसाहती अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे, रस्ते आणि इतर सुविधा कामांनाही गती मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईतील सिडको वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पालिकेकडून कंडोमिनियम अंतर्गत कामे होत नसल्याने सुविधा मिळत नव्हत्या परंतू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने ही कामे होण्याचा मार्ग माकळा झाला आहे. लवकरच ही कामे महापालिकेकडून करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहे.- नरेश म्हस्के, खासदार