नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिक स्वच्छतेविषयी जागरूक असल्यामुळे नवी मुंबईचे स्वच्छतेमधील राष्ट्रीय मानांकन नेहमीच उंचावत राहिले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रविवारी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबाग यांचे ३५०० हून अधिक श्रीसदस्य तसेच नागरिक एकत्र येऊन सायन पनवेल महामार्ग व रेल्वे स्टेशन्सच्या सखोल स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले ही समाधान व आनंद देणारी बाब असल्याचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिका आणि डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायन पनवेल महामार्ग तसेच बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी या ५ रेल्वे स्टेशन्सची सखोल स्वच्छता मोहीम आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यामध्ये २२ टन कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये प्लास्टिकचे तुकडे, रॅपर्स, एकल वापर प्लास्टिक, बॉटल्स, कागद, कपडा अशा प्रकारचा कचरा तसेच अस्ताव्यस्त वाढलेले गवत, वेली यांचाही हरित कचरा संकलित करण्यात आला.

उरण फाटा येथून आयुक्त महोदयांच्या उपस्थितीत स्वच्छतेची सामुहिक शपथ घेऊन प्रारंभ झालेल्या या स्वच्छता मोहीमेचे विभागनिहाय नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी श्रीसदस्यांच्या उत्साही लक्षणीय उपस्थिती होती. उरणफाटा येथे आयुक्त महोदयांसमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ १ उपआयुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ २ उपआयुक्त स्मिता काळे, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत १ जुलैपासून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने त्याची सुरूवात आधीपासूनच जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमातून केली असून आजचाही उपक्रम त्याच अभियानाचा भाग असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले. स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही परस्परपूरक गोष्टी असल्याने तसेच पावसाळी कालावधीत किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचे उच्चाटण करण्यासाठी ही स्वच्छता मोहीम राबविली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

सायन पनवेल हा नवी मुंबईतून जाणारा अत्यंत महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असून तो महानगरपालिकेच्या अखत्यारित नसला तरी त्याठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत महानगरपालिका स्वत:हूनच पुढाकार घेऊन तेथे नियमितपणे स्वच्छता मोहीमा आयोजित करीत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीमेत व्यापक लोकसहभाग लाभेल या भूमिकेतून आज आयोजित करण्यात आलेल्या सायन पनवेल महामार्ग व रेल्वे स्टेशन्स सखोल स्वच्छता मोहीमेत पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक जाणीवेने प्रेरित झालेल्या ३५०० हून अधिक श्रीसदस्य नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या सायन पनवेल महामार्ग स्वच्छता मोहीमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. बेलापूरपासून नमुंमपा हद्द ते कोकण भवन सर्कल, कोकण भवन सर्कल ते उरणफाटा ब्रीज सर्कल, उरणफाटा सर्कल ते डी.वाय.पाटील कॉलेज सर्कल, डी.वाय.पाटील कॉलेज सर्कल ते शिरवणे अंडरपास ब्रीज, शिरवणे अंडरपास ब्रीज ते जुईनगर फ्लायओव्हर ब्रीज, जुईनगर फ्लायओव्हर ब्रीज ते सानपाडा ब्रीज, सानपाडा दत्तमंदीर हायवे ते सानपाडा रेल्वे स्टेशन सर्कल, सानपाडा रेल्वे स्टेशन सर्कल ते वाशी सर्कल ब्रीज, वाशी सर्कल ब्रीज ते वाशी गाव बसस्टॉप, वाशी गाव बस स्टॉप ते वाशी टोलनाका अशाप्रकारे स्वतंत्र गट करून डॉ . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्य नागरिक यांना क्षेत्र वाटप करून देण्यात आले होते. त्याचप्रमाणे बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी या ५ रेल्वे स्टेशन्स परिसर सफाईसाठीही गटनिहाय नियोजन करुन स्वच्छता करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक गटासाठी बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे, नेरूळ विभागाचे सहा.आयुक्त प्रकाश जावडेकर, तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त सागर मोरे व वाशी विभागाचे सहा. आयुक्त सुखदेव येडवे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली त्या त्या क्षेत्राकरिता समन्वय अधिकारी नेमण्यात आले होते व त्यांच्यासोबत कार्यरत नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी यांचीही गटनिहाय नेमणूक करण्यात आलेली होती. या सर्वांच्या एकत्रित सक्रिय सहभागातून ही मोहीम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाली.