नवी मुंबई : बेलापूर येथील सिडको भवन या कार्यालयात सोमवारी नावडे व रोडपाली गावच्या ४० ग्रामस्थांनी शिरून सरकारी कार्यालयात गोंधळ घातल्याने बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साडेबारा टक्के भूखंडाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरीही या घटनेनंतर सिडको भवनाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडकोच्या सुरक्षा विभागाने याविषयी बेलापूर पोलीस ठाण्यात संबंधित ग्रामस्थांविरोधात गुन्हा नोंदवला.

रोडपाली आणि नावडे या गावांमधील ग्रामस्थांनी सोमवारी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सिडकोच्या सुरक्षा यंत्रणेची पुन्हा भंबेरी उडाली. संतापलेल्या महिला व पुरुषांनी एकत्र येऊन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या दालनाबाहेरील मोकळ्या जागेवर एकत्र जमून सिडकोच्या कारभाराविषयी जोरदार संताप व्यक्त केला. अचानक जाब विचारण्यासाठी आलेल्या या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला शांत करण्याचा सिडकोच्या सुरक्षा यंत्रणेने प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा लाभ झाला नाही.

शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका

१९८० साली या ग्रामस्थांची जमीन सिडकोने संपादित केल्यावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून दिले जाणारे साडेबारा टक्के भूखंड योजनेतील २०१९-२० साली सेक्टर ४५ येथे भूखंड देण्यात आले. मात्र काही मोजक्या शेतकऱ्यांना भूखंड दिल्यानंतर इतर शेतकऱ्यांना भूखंडाचे वाटप नंतर करू असा पवित्रा सिडकोने घेतला. मात्र अनेक वर्षांनंतरही भूखंड न दिल्याने नावडे व रोडपाली गावच्या महिला व पुरुष शेतकरी सिडकोत शिरले.

दोन महिन्यांत प्रश्न मार्गी लावणार

या अचानक पुकारलेल्या आंदोलनानंतर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक देशमुख यांनी शेतकऱ्यांना शांत केल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा केली. पुढील दोन महिन्यांत शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड देण्याची कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. मात्र देशमुख यांच्या कारकीर्दीत भूखंडवाटप सर्वाधिक करूनही शेतकऱ्यांनी कोणतीही कल्पना न देता अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली.