नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर विमानतळ मार्गावर जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतूक गाड्याची वाहतूक प्रचंड वाढणार आहे. हे लक्षात घेता ठाणे-बेलापूर मार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर एका उड्डाणपुलाचे काम सुरू असून या व्यतिरिक्त क्रिस्टल हाऊस ते पावणे, बीएसएफ कंपनी ते हुंदाई शो रूम, आणि रबाळे जंक्शन असे तीन उड्डाणपूल निर्माण करण्यात येणार आहेत. या उड्डाणपुलांसाठी ६१९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च हॅम्प या केंद्रशासनाच्या योजनेनुसार करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे मिरा-भाईंदर ते पनवेल उरण आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्ग सुसाट होणार आहे तर ठाणे बेलापूर मार्गावर काटई बोगद्याला पूरक मार्ग असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक वेगात होणार आहे.
नवी मुंबई शहरातून ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल हे दोन महामार्ग जातात. येत्या वर्षभरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार आहे. सद्यस्थितीत या मार्गावर ऐरोली, रबाळे, तुर्भे येथे हमखास वाहतूक कोंडी होत असते. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साठते. त्यात आता रस्त्याची अवस्था अनेक ठिकाणी खराब झाली आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर प्रवासी आणि माल वाहतूक प्रचंड वाढणार असल्याने ठाणे बेलापूर मार्गाला अनन्य साधारण महत्त्व येणार आहे. त्यामुळे आता रस्त्याचे नूतनीकरण आणि आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल निमिर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ता खूप खराब आहे अशा ठिकाणी सिमेंट ब्लॉक काढून नव्याने बसवणे, पावसाळ्यात पाण्याचा निचरा त्वरित होण्याच्या दृष्टीने गटर बांधणे , या शिवाय जागेनुसार वृक्ष लागवड केली जाणार आहे.
ठाणे बेलापूर मार्गाचे नूतनीकरण काम हाती घेण्यात येणार आहे. यात मार्गाचे नूतनीकरणासह तीन नवीन उड्डाणपुलांचा समावेश आहे. आगामी कामात प्रवासी आणि माल वाहतुकीत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. – शिरीष आरदवाड ,शहर अभियंता
उड्डाणपुलांचा अपेक्षित खर्च
- क्रिस्टल हाऊस ते पावणे – ११० कोटी
- बीएसएफ ते हुंदाई कंपनी शो रूम – ३३८ कोटी
- रबाळे जंक्शन – १७१ कोटी
