पनवेल – दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन झाले. उदघाटनावेळी राज्य व देशातून आलेल्या मान्यवरांना येथील रस्ते चकाचक दिसावे म्हणून लाखो रुपये खर्च करून सिडको मंडळाने रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम केले आहे. विमानतळ अजूनही सुरू झाले नसले तरी या विमानतळ मार्गाने उलवा ते करंजाडे या मार्गावर प्रवास करणा-यांसाठी हे चकाचक रस्ते विना गतिरोधक बनविल्यामुळे हा मार्ग सूसाट मार्ग म्हणून ओळखला जातो. शुक्रवारी दुपारी चार वाजता याच सूसाट मार्गावर चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या पहिल्याच अपघाताने परिसरात इतर प्रवाशांचे लक्ष्य वेधून घेतले. काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला झालेल्या या सूसाट मार्गावर तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि क्षणार्धात घटनास्थळ धुराच्या लोटांनी आणि आवाजांनी दणाणून गेलं.
पनवेलकडून विमानतळाच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या एका मोटारीने समोरून येणाऱ्या छोट्या टेम्पोला जबर धडक दिली. या धडकेचा आवाज एवढा मोठा होता की काही क्षणात आसपासच्या मजूरवर्गाने तेथे धाव घेतली. दरम्यान, मागून येणारी आणखी एक मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट या अपघातात झालेल्या वाहनांना तीने धडक दिली. तिन्ही वाहनं एकमेकांवर आदळल्याने टेम्पो उलटला आणि रस्त्यात पूर्णपणे अडथळा निर्माण झाला.
सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. प्राथमिक तपासात सूसाट मार्गावर गतिरोधक नसणे, बेफाम वेग आणि निष्काळजीपणा ही तीन मुख्य अपघाताचे कारण असल्याचे समोर आले आहे. नव्याने तयार झालेल्या या सूसाट मार्गावर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य आणि वाहनांची वर्दळ असल्याने पोलिसांनी सर्व वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
विमानतळ मार्गावरील हा पहिलाच अपघात आहे. विमानतळ सुरू झाल्यावर वेगाची स्पर्धा लावणा-या मोटारचालक किंवा दुचाकीस्वारांना या मार्गाचा वापर करण्यापासून पोलिसांनी रोखण्यासाठी येथे वाहतूक पोलीस चौकी सुरू करून तेथे पोलिसांची तातडीने नेमणूक करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.