नवी मुंबई : नवी मुंबई येथील अत्यंत बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आता २८५ पोलिसांची पदे भरण्यास गृह विभागाने मंजूरी दिली आहे. विमानतळावरील चेकपोस्टसाठी ही पदे असणार आहेत. त्यासाठी १० कोटी १० लाख ८८ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पद भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्यापासून सुरु करण्याची योजना सरकारने आखली आहे. नवी मुंबई विमानतळ पनवेल आणि उलवे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे. या विमानतळासाठी सिडको प्रशासनाने उलवे, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे, वाघीवली गाव, वाघीवली पाडा, वरचे ओवळा, कोपर, कोल्ही, चिंचपाडा येथील गावांच्या जमीनी संपादित केल्या आहेत. या विमानतळामुळे मुंबई महानगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर प्रती वर्षी नऊ कोटी प्रवासी वाहतुकीचे नियोजन आहे. त्यामुळे विमानतळावर सुरक्षा महत्त्वाची ठरते.

विमानतळावरील इमिग्रेशन चेकपोस्टसाठी २८५ पदे नव्याने तयार करण्यास गृह विभाग विचाराधीन होता. अखेर या प्रस्तावास नुकतीच राज्य सरकारीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता २८५ पदांसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पद निर्मिती करिता १० कोटी १० लाख ८८ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भाचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळाची वैशिष्ट्ये

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भुमीपूजन सोहळा १८ फेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता. या विमानतळावर चार प्रवासी टर्मिनल, दोन धावपट्टी, एक कार्गो ट्रक टर्मिनल तसेच महत्त्वाच्या संरक्षण आणि नागरी हवाई वाहतुक विभागाशी संबंधित आस्थापना यामध्ये असणार आहेत. तसेच प्रती वर्षी ९ कोटी प्रवासी वाहतुक आणि ३६० कोटी मेट्रिक टन मालाची प्रति वर्ष वाहतुकीचे नियोजन आहे.