उरण : हिस्स्यासाठी भावा बहिणींनी एकमेका विरोधात दाखल केलेले न्यायालयातील दावे मागे घेत लोकआदलतीत समझोते करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे मालमत्तेतील हिस्स्यासाठी उसवलेली भावा – बहिणींच्या नात्यांची वीण पुन्हा जुळू लागली आहे. राखी पौर्णिमेमुळे या घटनेला अधिक महत्व आले आहे. पुरुषी मानसिकतेच्या पगड्यातून आपल्या बहिणींना वडिलोपार्जित मालमत्तेतील समान हिस्सा (हक्क) नाकारला जात आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आपल्या भावांच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल केले आहेत. परिणामी भावा बहिणींचे नाते संपुष्टात आले आहेत. यातील अनेकजण हे वयाच्या ८० ते ९० मध्ये आहेत.

भूसंपदानाच्या, विक्री तसेच वाढीव मोबदल्यात शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनीला कोट्यवधींचा मोबदला मिळू लागला आहे. यातील समान हिस्सा बहिणींनाही मिळावा अशी मागणी बहिणीकडून केली जात आहे. मात्र अनेक भावाकडून बहिणीचा हा हक्क नाकारला जात आहे. त्यामुळे अनेक बहिणींनी आपल्या रक्ताच्या सख्ख्या भावा विरोधातच न्यायालयात दावे दाखल केले आहेत. याचा परिणाम रक्ताच्या नात्यातील भाऊबीजेच्या सणावर परिणाम झाला आहे. यातून अनेक बहीण व भावांचे रक्षा बंधन व भाऊबीजेचे सण बंद झाले आहेत. संपतीच्या वाट्यासाठी रक्ताची नाती तुटू लागली आहेत. उरण तालुक्यात आशा प्रकारच्या १ हजार ५०० हुन अधिकचे दावे न्यायालयात दाखल आहेत. या दाव्यांची सुनावणी सुरू असून बहिणी आणि भाऊ न्यायालयाच्या आवारात एकमेकांचे तोंड देखील पाहत नाहीत.

शेतकऱ्यांच्या वारसांना या रकमा त्यांच्या वडिलोपार्जित शेतीच्या बदल्यात मिळत आहेत. त्यामुळे त्यातील हिस्स्या भावाप्रमाणे बहिणींना ही मिळावा अशी मागणी बहिणीकडून केली जात आहे. तर भावाकडून आम्ही देतो ते घ्या अशी भूमिका घेतली जात आहे. मात्र न्यायाने बहिणींना ही समान हिस्स्याचा वाटा असल्याने यातील अनेक बहिणींनी आपल्या भावांच्या विरोधात थेट न्यायालयातच दावे दाखल केले आहेत. या कोट्यवधी रुपयांच्या हिस्सा वाट्यामुळे अनेक बहीण भावांची नाती तुटली आहेत व तुटण्याच्या मार्गावर आहेत. कोट्यवधी रुपयांसाठी रक्ताची नाती संपू लागली आहेत. यातील अनेक भाऊ बहिणी या वयाच्या शेवटच्या टप्यात आहेत. त्यांना केवल पैशासाठी रक्ताची नाती तोडायची नाहीत. मात्र मुलांच्या व पतीच्या दबावाखाली आशा प्रकारचे दावे दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे पैशासाठी नातेसंबंधात दुरावा निर्माण होत असल्याने कुटुंबवत्सल समाजाला ही घरघर लागू लागली आहे.

आता पर्यंत ४ हजार कोटींचे वाटप : सिडको आणि शासनाकडून नवी मुंबई उरण, पनवेल व नवी मुंबई येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. तर शिल्लक शेतकऱ्यांचे वाढीव दराचे निकाल लागल्या नंतर जवळपास १० हजार कोटीं पर्यंत ही रक्कम जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मालमत्तेवर समान हक्क मिळालेले आहेत, विशेषतः हिंदू उत्तराधिकार कायद्यात दुरुस्ती (२००५) नंतर. मुलींना त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या दोन्ही मालमत्तेत मुलांप्रमाणे समान वाटा मिळवण्याचा अधिकार आहे. महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळवण्याचे कायदेशीर अधिकार आहेत.

हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ (सुधारणा २००५):

या कायद्याने मुलींना मुलांप्रमाणे वडिलोपार्जित मालमत्तेत समान वाटा मिळवण्याचा अधिकार दिला आहे.

आईच्या मालमत्तेतील वाटा:

मुलींना त्यांच्या आईच्या स्व-अधिग्रहित मालमत्तेतही मुलांच्या बरोबरीचा वाटा मिळतो. वडिलांच्या मालमत्तेतील वाटा:

मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित आणि स्व-अधिग्रहित दोन्ही मालमत्तेत समान वाटा मिळवण्याचा अधिकार आहे.

पतीच्या मालमत्तेतील वाटा:

पतीच्या मालमत्तेत पत्नीला कायदेशीर वाटा मिळवण्याचा अधिकार आहे, विशेषतः घटस्फोट किंवा निधनाच्या परिस्थितीत हा हक्क आहे.

मालमत्तेतील हिस्स्यासाठी न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे न्यायालया बाहेर म्हणजे लोकआदालतीत मागे घेतले जात आहेत. अशी माहिती उरण वकील संघटनेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय नवाले यांनी दिली आहे.