नवी मुंबई – भारतीय हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याकरिता आज देण्यात आलेला रेड अलर्ट व २० ऑगस्टपर्यंत दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश दिले असून सर्व विभागांचे संपर्क अधिकारी तसेच विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी व विभागातील आपत्कालीन कक्षातील कर्मचारी तसेच स्वच्छता निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात मदत कार्यासाठी कार्यरत आहेत.
काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 022-27567060 किंवा 022-27567061 या क्रमांकावर अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे. शनिवार सकाळपासूनही शहरात जोरदार पाऊस सुरू असून पावसाचे सातत्य कायम आहे. दुसरीकडे आज पावसात दहीहंडी उत्सवही सुरू असून नवी मुंबई शहरातील शाळांना सुट्टी नव्हती. परंतु एकीकडे दहीहंडीचा उत्सव आणि जोरदार पाऊस यामुळे शाळांमध्ये खूप कमी प्रमाणात विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१५ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२५ पर्यंत झालेला पाऊस
- बेलापूर – १४०.२०मिमी
- नेरूळ – १४६.४० मिमी
- वाशी – १३३ मिमी
- कोपरखैरणे – १७२.२०मिमी
- ऐरोली – ११३ मिमी
- दिघा – १०३.२० मिमी