नवी मुंबई : नवी मुंबईतील एका व्यक्तीला व्ही.पी.एन ( virtual private network ) प्रणालीचा वापर करून फोन वर दोन कोटी खंडणीची मागणी करण्यात आली आहे. जर खंडणी दिली नाही तर कुटुंबियांना गोळया झाडून ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होत असून राज्यात सर्वाधिक प्रगती होत असलेले मालमत्ता जगत म्हणून या शहराची ओळख होत आहे. यातूनच विकासकाला खंडणी साठी फोन आल्याचे प्रकरण समोर आल्यावर विकासक वर्गात खळबळ उडाली आहे. नवी मुंबईत राहणारे एक विकासक यांना एका अनोळखी व्यक्तीने १३ तारखेला समाज माध्यमातून व्हाईस कॉल केला तसेच संदेश पाठवला. त्यानुसार दोन कोटी रुपये दोन दिवसात दे अन्यथा तुझ्या एकुलता एक मुलगा, पत्नी आणि भावाला गोळ्या झाडून ठार करेल अशा आशयाचे हिंदी भाषेत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात खंडणी घमकी सह टेलिकम्युनिकेशन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खंडणी खोराने संपर्क करण्यासाठी व्ही.पी.एन ( virtual private network) या नेटवर्कचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नेमका कुठून फोन केला याचा तपास करणे पोलिसांच्या समोर आव्हान आहे. या प्रकरणी सखोल माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शिवली आहे. यापूर्वी कचरा कंत्राट प्रकरणी ३ जानेवारीला सानपाडा येथे एका कंत्राटदारावर गोळीबार झाला होता. त्यातील संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर खंडणी किंवा कंत्राट दादागिरी करून गुन्हे घडले नव्हते. मात्र आता पुन्हा खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.