नवी मुंबई : उरण येथील चिटफंड घोटाळा राज्यभर गाजत असताना आता रबाळे पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून फसवणूक झालेल्या लोकांनी गुन्हे दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोहेल शेख आणि मनोज पवार अशी यातील आरोपींची नावे आहेत. अब्बास खान हे सुरक्षा अधिकारी असून विलेपारले येथे राहतात. समाज माध्यमात त्यांनी सलजात फिश लिमिटेड या कंपनीची जाहिरात पहिली. या कंपनीचे कार्यालय वाशी सेक्टर २८ येथे असल्याचे त्यात नमूद केले होते. तसेच जाहिरातीत “पैसे गुंतवा सहा महिन्यात दुप्पट होतील” असा मजकूर होता. आपणही गुंतवणूक करावी या उद्देश्याने खान यांनी जाहिरातीत नमूद असलेल्या फोनवर संपर्क साधला.

पैसे गुंतवणूक केल्यास याच पैशांची गुंतवणूक आम्ही फिशिंग पॉन्ड व्यवसायात करतो व त्यातून सहा महिन्यात दुप्पट परतावा देणार आहोत, असे खान यांना सांगण्यात आले. सुरुवातीला २५ हजार आणि प्रत्यक्ष भेट घेत दोन लाख अशी एकूण सव्वादोन लाखांची गुंतवणूक खान यांनी केली. विशेष म्हणजे त्याच वेळेस आरोपींनी खान यांना सहा महिन्यांच्या नंतरचा म्हणजेच २७ फेब्रुवारी २०२३ तारखेचा चार लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश दिलेल्या तारखेला बँकेत टाकला असता वटला नाही.

हेही वाचा : समुद्राच्या उधाणाने नादुरुस्त बंदिस्तीच्या कामाला सुरुवात, नोव्हेंबरमध्ये होणार कायमस्वरूपी मजबुतीचे काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्यवहार ६ जून २०२२ ते १३ जून २०२२ दरम्यान झाला आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. खान यांनी  अनेकदा आरोपींशी संपर्क साधला मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्यावर खान यांनी दोघांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या एक तक्रार आली आहे याची व्याप्ती वाढू शकते, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. आरोपींनी अशाच पद्धतीने फसवणूक केली असेल तर पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.