नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळावरुन पहिले उड्डाण डिसेंबर महिन्याच्या मध्यावर होईल अशी चिन्हे असतानाच, आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हे उड्डाण देशांतर्गत असेल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस या कंपनी द्वारे नवी मुंबई विमानतळावरुन दररोज २० उड्डाणे देशातील १५ शहरांच्या दिशेने होतील, असे मंगळवारी कंपनीच्या वतीने स्पष्ट झाले. यापूर्वी इंडिगो आणि आकासा एअर या कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावर उड्डाणासाठी आदानी एअरपोर्ट होल्डिंग्स या कंपनीसोबत करार केला आहे. या दोन कंपन्यांचा करारही सुरुवातीच्या टप्प्यात देशांतर्गत विमान वाहतूकीसाठी झाला आहे, अशी माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दोन समांतर धावपट्ट्या, अत्याधुनिक टर्मिनल, प्रगत मालवाहतूक सुविधा आणि हरित पर्यावरणपूरक सुविधा असलेले हे विमानतळ उद्घाटनापूर्वी पासूनच चर्चेत आहे. उद्घाटनानंतर किमान दोन महिने तरी या विमानतळावर प्रत्यक्ष विमान सेवा सुरु होण्याकरता लागतील असे सिडकोचे म्हणणे आहे.

उद्घाटनानंतर विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था, आधुनिक यंत्र प्रणालीची आखणी करण्याकरता हे दोन महिने लागतील असे सांगण्यात येते. दरम्यान, हे विमानतळ आंतरराष्ट्रीय असले तरी पहिल्या टप्प्यात इथून देशांतर्गत विमानसेवा सुरु होईल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. नवीमुंबई विमानतळाची चलणाची जबाबदारी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक उड्डाणासाठी यापूर्वीच एअर लाईन इंडिगो आणि आकासा एअर सोबत भागिदारी करार केला आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात आकासा एअर दर आठवड्याला या विमानतळावरुन १०० पेक्षा अधिक देशांतर्गत उड्डाणे सुरु करेल आणि हिवाळी वेळापत्रकात ही उड्डाणे १५० पेक्षा अधिक असतील असा दावा यापूर्वीच कंपनी तर्फे केला गेला आहे. मार्च २०२७ पर्यंत आकासा एअर कडून या विमानसेवेचे टप्प्याटप्प्याने विस्तारिकरण होणार आहे. इंडिगो एअर लाईने देखील सुरुवातीच्या टप्प्यात देशातील १५हून अधिक शहरांमध्ये १८ उड्डाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने ही उड्डाणे वाढवली जातील.

परंतू, सुरुवातीच्या टप्प्यात इंडिगो एअर लाईनची व्यावसायिक उड्डाणे ही देखील देशातील वेगवेगळ्या शहरांमध्येच होतील अशी सूचना आहे. इंडिगो आणि आकासा एअर लाईने यापूर्वीच आपल्या उड्डाणांची स्पष्टता केली असताना मंगळवारी, एअर इंडियाची लो कॉस्ट शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसद्वारे या विमानतळावरुन १५ शहरांमध्ये २० उड्डाणे केली जातील असे जाहीर करण्यात आले. एअर इंडियाच्या निवेदनानुसार, २०२६ पर्यंत या उड्डाणांची संख्या ५५ रोजच्या उड्डाणांपर्यंत, ज्यात पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील, अशी वाढवली जाणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अदानी एअर्ससोबत काम करून नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ भारताच्या इतर भागाशी जोडणारे विमानतळ म्हणून नव्हे, तर जागतिक प्रवासी आणि मालवाहतूक हब म्हणून विकसित होईल. – कॅम्पबेल विल्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, एअर इंडिया समूह.

एअर इंडियाशी झालेल्या भागीदारीमुळे नवीमुंबई विमानतळावरुन अत्याधुनिक उड्डाणसेवा प्राप्त होऊ शकेल. – अरुण बंसल, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स.