लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : सिडको महामंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी, १७ नोव्हेंबरला नवी मुंबई मेट्रो १ या मार्गिकेचा विना उद्घाटन लोकार्पन सोहळा केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला पुन्हा एकदा नवी मुंबई मेट्रो १ मार्गिकेचे उद्घाटन करण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. आतापर्यंत साडेसात लाखांहून अधिक प्रवाशांनी या मेट्रोतून प्रवास केला आहे.

बेलापूर ते पेंधर धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने १२ जानेवारीला उलवा येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील मंडपातून करण्यात येणार आहे. मोदी यांच्या हस्ते विविध सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यात नवी मुंबई मेट्रोचाही समावेश असल्याचे यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा >>>नवी मुंबई : गुगल मॅपवर रिव्ह्यूसाठी पैशाचे आमिष, साडेतीन लाखांची फसवणूक 

प्रवाशांचे हित ध्यानात घेऊ न मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरुन १७ नोव्हेंबरला नवी मुंबई मेट्रो सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत मेट्रोमुळे दोन कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ वर्षांनंतर नवी मुंबईकरांचे मेट्रोतून प्रवासाचे स्वप्न साकार झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तळोजा ते बेलापूर या मेट्रो प्रवासास १५ मिनिटे लागतात. सिडकोने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी २९५४.१४ कोटी रुपये खर्च केला आहे. मेट्रो क्रमांक १ मार्गावर ११ मेट्रो स्थानके आहेत. बेलापूर, खारघर सेंट्रलपार्क आणि पेंधर या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई मेट्रोपेक्षा या नवी मुंबई मेट्रोचे तिकीटदर जास्त आहेत. उद्घाटनानंतर तरी ते कमी करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.