नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शनिवारी (२७ सप्टेंबर) महापालिका आणि भाजपच्या माजी नगरसेवकांसोबत पार पडलेल्या आढावा बैठकीत भाजपच्या माजी नगरसेवकांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच यंदाच्या महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची आक्रमक मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरातील प्रभागांमधील प्रलंबित नागरी कामांवर उपाय शोधण्यासाठी वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रातील सभागृहामध्ये महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या माजी नागरसेवकांकडून आपल्या प्रभागातील प्रलंबित कामांची माहिती देत, त्यांना गती देण्याची मागणी केली.

या आढावा बैठकी दरम्यान, भाजपच्या माजी नागरसेवकांकडून नवी मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना शिंदे गटाविरोधात तीव्र असंतोष दिसून आला. महापालिका आयुक्तांकडून आमची कामे केली जात नाहीत, तर ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री असल्याने त्यांच्या प्रभावामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची कामे मात्र मार्गी लावली जात आहेत, अशी तक्रार माजी नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्यासमोर केली.

तसेच, येत्या आठ दिवसांत भाजपच्या माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ वर्षा निवासस्थानी जाऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार मांडणार असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय भाजपच्या माजी नगरसेवकांनी नवी मुंबई महापालिकेविरोधात मोर्चा काढण्याची भूमिकाही जाहीर केली आहे. याचवेळी ‘स्वबळावरच निवडणूक लढवू’ असा नारा देत माजी नगरसेवकांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपच्या माजी नगरसेवकांच्या या मागणीमुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) हा संघर्ष अधिक तीव्र झालेला पाहायला मिळतो आहे.

गेले अनेक दिवस नवी मुंबईतील नाईक कुटुंबीय आणि शिवसेना शिंदे गटात धुसपुस सुरू आहे. कधी अप्रत्यक्षपणे तर कधी थेट नाव घेऊन दोन्हीबाजूने एकमेकांविरोधात शाब्दिक चकमकी सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून नवी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत सावध भूमिका घेतली जात असून “आमची इच्छा महायुतीत लढण्याची आहे. ज्यांना वेगळं लढायचं आहे त्यांनी लढावं.” असं विधान नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नरेश म्हस्के यांनी मांडली होती. परंतु, अंतिम निर्णय वरिष्ठांचा असेल असं ही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

शनिवारी(२७ सप्टेंबर) नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत होते. यावेळी खा. नरेश म्हस्के आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नवी मुंबईतील घराणेशाहीवर भाष्य केले असले तरी एकनाथ शिंदे यांनी मात्र या विषयी थेट भाष्य करणे टाळले. एकनाथ शिंदे यांनी याविषयी अतिशय संयमी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

मात्र, नवी मुंबईत भाजपच्या माजी नगरसेवकांकडून देण्यात आलेला स्वबळावरचा नारा आणि शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येणारी कुरघोडी यामुळे नवी मुंबईचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळणार का? की महापालिका निवडणुकी आधी सगळं विसरून दोन्ही पक्ष महायुतीत लढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.