नवी मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर पालिका निवडणुकांच्या प्रशासकीय प्रक्रियेला वेग आला आहे. प्राधिकृत अधिकारी नगरविकास यांच्याकडून अंतिम केलेला प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आला आहे . आज ६ ऑक्टोंबरला राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिध्द केली जाणार असून आता सर्वांचे लक्ष अंतिम प्रभाग रचनेकडे लागले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या सुरवातीला प्रारुप प्रभागरचना जाहीर केली होती. प्रारुप प्रभागरचनेवर हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. नवी मुंबई महापालिकेकडे २५५१ हरकती सूचना घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी अंतिम केलेली प्रभागरचना राज्य शासनाकडे सादर केली होती. प्रभागरचनेचा संबंधित अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना शासनाकडे सादर करण्यासाठी १३ ते १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. प्रभागरचना शासनाकडे सादर झाली.त्यानंतर शासनाच्या नगररचना विभागाने ती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.आता राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम केलेली प्रभागरचना आज प्रसिद्द केली जाणार आहे. त्यामुळे अंतिम प्रभागरचनेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभागरचनेवर २२५१ हरकती घेतल्या होत्या.तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. शहरातील विविध पक्ष तसेच इच्छुकांमध्ये प्रारुप प्रभागरचेवरुन नाराजी होती. हरकती घेण्याच्या शेवटच्या दिवशी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या होत्या. सर्वात जास्त हरकती नेरुळ विभागातून तर सर्वात कमी हरकती बेलापूर विभागातून प्राप्त झाल्या होत्या. तर सर्वच राजकीय पक्षांचे सुनावणीकडे लक्ष लागले होते. परंतु पालिकेने राबवलेल्या सुनावणीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी २८ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्या त्या प्रभागासाठी घेण्यात आलेल्या हरकतीच्या सुनावणीसाठी हरकतदारांना वेळेनुसार उपस्थित राहण्याचे सूचित करण्यात आले होते. हरकतदारांना दिलेल्या वेळेच्या आधी १५ मिनिटे उपस्थित राहण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्याप्रमाणे हरकतदारांनी आपले म्हणने मांडले. नवी मुंबई महापालिकेकडून घेण्यात आलेल्या हरकतींवर ५६७ हरकतदार उपस्थित होते. आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना अत्यंत महत्वाची ठरणार असून प्रभागरचनेवरच अनेकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे झालेल्या सुनावणीत वाद प्रतिवाद निश्चीत मानले जात होते.परंतु हरकतदारांच्या सूचना फक्त ऐकून घेतल्या गेल्या व नियमानुसार पुढे कार्यवाही झाली.
नवी मुंबई महापालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकींसाठीच्या प्रारुप प्रभागरचनेवर २०० पेक्षा जास्त हरकती घेण्यात आल्या होत्या. यंदा पालिका निवडणुकीसाठीच्या प्रारुप प्रभागरचनेवर तब्बल २५५१ हरकती प्राप्त झाल्या होत्या. परंतु सनावणीसाठी फक्त ५६७ जनच उपस्थित राहीले होते. शासनाकडे व आता शासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रभागरचनेत नक्की काय लपलय याची उत्सुकता आज सर्वांनाच लागली आहे.
नवी मुंबई महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा आज…
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभागरचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर सुनावणी झाली होती. सुनावणीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या रस्तोगी यांच्याकडून प्रभागरचनेवर काही बदल करुन प्रभागरचना नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आली. तसेच नगरविकास विभागाने प्रभाररचना निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याची मुदत ६ ऑक्टोंबर आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम प्रभागरचनेकडे लागले आहे.
तर राज्यभरातील विविध महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागरचनेबाबतचे वेळापत्रक निवडणूक आयोगाद्वारे निश्चित करण्यात आले होते. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरु असून त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे अंतिम केलेली प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाद्वारे प्रसिध्द करण्यात येईल असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.