राज्यात मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे आणि वनमंत्री ज्या शहरातून येतात त्या भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नगरविकास विभाग आणि महापालिकेतील निवडणूक यंत्रांच्या विरोधात गळा काढण्याची वेळ आली आहे. हे चित्र तसे विरळच म्हणायला हवे. नियमांची ऐशीतैशी करत आमचे प्रभाग उभे आडवे कापले गेल्याचा टाहो भाजपचे बहुसंख्य माजी नगरसेवक फोडत आहेत. ही ‘प्रभागचोरी’ एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार झाली आहे असाही या मंडळींचा आरोप आहे.
‘राज्यात सत्ता आमची, मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा आणि आमच्यावरच ही वेळ यावी’ या विचाराने भाजपची स्थानिक नेतेमंडळी चक्रावून गेली आहेत. गणेशोत्सवाची धामधूम संपली की प्रभागचोरीचा हा मुद्दा पुन्हा जोर धरेल. या आराखड्याविरोधात शेकडो, हजारो हरकतींची तयारी सुरू होईल. या विरोधाचे परिणाम काय दिसतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच, परंतु भाजप आणि शिंदे या दोन पक्षांत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षात महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेने धरलेली गुपचिळी संशयाचे धुके अधिक गडद करणारे ठरले आहे. नवी मुंबई हा काही दशकांपासून राहिला आहे.
नाईक कोणत्याही पक्षात असोत महापालिकेवर ते सत्ता आणतात, असा आजवरचा अनुभव. राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्ताबदल झाला तेव्हा गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच हे घडले असा जाहीर आरोप नाईक समर्थकांनी यापूर्वीही केले आहेत. नाईकांच्या मनातही कदाचित हे शल्य असावे. नोव्हेंबर महिन्यातील मोठ्या विजयानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होताच नाईकांनी मोठ्या कौशल्याने मंत्रिमंडळात स्थान मिळविले. देशातील एका मोठ्या उद्योगपतीची त्यांना साथ लाभल्याचा टोला मध्यंतरी शिंदे गटाच्या एका नेत्याने त्यांना लगाविला, तेव्हा नाईकांनीही ‘मला सर्वांचे सहकार्य मिळाले’ अशा वाक्यात वेळ मारून नेली.
मंत्रिमंडळात आल्यापासून नाईकांनी शिंदे यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन ‘ओन्ली कमळ’चा नारा त्यांनी दिला. नवी मुंबईचे पाणी, भूखंड कुणी चोरले ? असा सवाल करत ठाण्यावर ते बरसले. १५ ऑगस्टच्या एका कार्यक्रमात तर नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्याचा टोला हाणला. ‘आपण कोणत्या मार्गाने कमवितो याकडे लोकांचे लक्ष असते’ असेही ते बोलून गेले. इतके सगळे होत असताना शिंदे यांनी मागील सहा महिने नाईकांविषयी साधा ‘ब्र’ देखील उच्चारलेला नाही. नाईकांशी उघड संघर्ष करायचा नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. मात्र शिंदे यांचा एकंदर स्वभाव लक्षात घेता ते ‘थंड करून खातील’ हे स्पष्टच होते. महापालिका निवडणुकांसाठी आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी प्रभाग रचनेचा जो काही आराखडा जाहीर केला आहे. शिंदेंची ही चाल कुणाच्याही लक्षात यावी अशीच आहे.
नाईक यांच्या बालेकिल्ल्यास सुरुंग ?
शिंदे यांना यंदा नाईकांचा बालेकिल्ला काहीही करून खालसा करायचा आहे. मध्यंतरी शिंदे यांची दिल्लीवारी चर्चेत होती. या दौऱ्यांमध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढविण्याचा आग्रह भाजप श्रेष्ठींकडे धरल्याचे बोलले जाते. नाईकांना नवी मुंबईत शिंदे यांच्या पक्षाशी युती नको आहे. शहरातील सत्तेत शिंदेंचे नगरसेवक वाटेकरी म्हणून नाईक सहन करणार नाहीत हे स्पष्टच आहे. अशा परिस्थितीत दिल्लीहून असा आदेश आलाच तर नाईकांची मोठी अडचण होणार आहे. शिंदे यांच्या राजकारणाची पद्धत लक्षात घेता असे श्रेष्ठींच्या काठीने नाईकांची अडचण करणार नाहीत असे कुणालाही म्हणता येणार नाही. या व्यूहरचनेचा भाग म्हणून उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस या पक्षांतील उरल्यासुरलेल्या माजी नगरसेवकांना हवी ती ‘किंमत’ मोजून शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षात घेतले.
नवी मुंबईत नाईकांना आव्हान द्यायचे असेल तर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये लढणाऱ्यांची कुमक हवी याची पूर्ण कल्पना शिंदे यांना आहेच. त्यामुळे हात मोकळा सोडत पक्षात येऊ पाहणाऱ्यांना शिंदेकडून लाल गालिचा अंथरला जात आहे. शहरातील जवळपास ५० माजी नगरसेवक त्यांनी आपल्या पक्षात घेतले आहेत. युती झाली तर या जागांवर दावा सांगायचा आणि संघर्षाची वेळ आलीच तर नाईकांविरोधात कुमक तयार ठेवायची अशी ही आखणी आहे. विशेष म्हणजे, प्रभागांची रचनाही त्यांच्या पक्षाला हवी तशी केली जात असल्याचा आरोप आता होत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत आणि ठाणे जिल्ह्यात मात्र शिंदे म्हणतील तीच पूर्व दिशा असा कारभार सुरू असल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेविषयी आरोप, तक्रारींचा सूर सर्वत्र असताना या रचनेच्या आराखड्यावर स्वाक्षरीची मोहर उमटविणारे महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्या गुपचिळीमुळे संशयाचे धुके अधिक गडद बनले आहे.