नवी मुंबई : नवी मुंबई शहरात भटक्या आणि पाळीव श्वानांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पिटबुल, जर्मन शेफर्ड, डोबरमन, रोटविलर यांसारख्या आक्रमक आणि हिंस्त्र स्वभावाच्या श्वानांचे बेकायदेशीर पालन आणि पैदास रोखण्यासाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली असून, याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नियमावलीचे पालन झाले नाही तर, संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांकडून चावणे, मागे लागणे तसेच लहान मुलांमध्ये भीती निर्माण होणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच, रोटविलर (Rottweiler), पिटबुल (Pit Bull), जर्मन शेफर्ड (German Shepherd), डोबरमन (Dobermann) यांसारख्या काही हिंस्त्र स्वभावाच्या श्वानांची पालन-पैदास बेकायदेशीर पद्धतीने केल्याच्या तक्रारीही महापालिकेला मिळाल्या आहेत. या जातीचे श्वान स्वभावाने आक्रमक असल्यामुळे, त्यांना रस्त्यावर मोकळे सोडल्यास इतर नागरिकांच्या जीवाला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगाने, महापालिकेने अशा प्रकारच्या श्वानांच्या नियंत्रणासाठी कडक पावले उचलली असून नियमावली जाहीर केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्राणी संरक्षणासह नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार, नवी मुंबई महापालिकेने काही नियमावली जाहीर केली असून पाळीव प्राण्यांच्या मालकांनी या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पशू जन्म नियंत्रण कार्यक्रमाची कायदेशीर अंमलबजावणी सुरू असून, त्यानुसार शहरातील भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी २००६ पासून तुर्भे येथील श्वान नियंत्रण केंद्र कार्यरत आहे. तसेच, पाळीव श्वानांसाठी विभागीय कार्यालयांमार्फत श्वान परवाने देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने, सर्व पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना प्राप्त करण्यासाठी महापालिकेच्या nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
या नियमांचे पालन करण्याचे निर्देश
- सर्व जातींच्या पाळीव श्वानांचे लसीकरण बंधनकारक
- श्वानांना चेन/बेल्ट लावूनच घराबाहेर नेणे
- श्वानासोबत स्कूप (सुपली) बाळगणे
- श्वानाला त्रास होणार नाही अशा प्रकारचा मझल (Muzzle) लावणे
- श्वान परवाना घेणे आणि नियमित नूतनीकरण करणे
नियमांचे पालन केले नाही तर, दंडात्मक कारवाई
मझल लावल्याशिवाय श्वान फिरवताना आढळल्यास महापालिकेमार्फत कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा महापालिकेने दिला आहे.