नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांनी युक्त अशी वेगवेगळी शहरे आणि लगतच उभे राहाणारे वेगवेगळे उद्योग यामुळे गेल्या काही वर्षांपासून स्मार्ट उद्योग क्षेत्राच्या धर्तीवर विकसित केल्या जाणाऱ्या तळोजा एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा थेट वापर करण्याचा अधिकार आता नवी मुंबई पोलीस तसेच पनवेल महापालिकेलाही मिळेल अशी व्यवस्था आता महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाकडून उभी केली जात आहे.

एमआयडीसीने तळोजा अैाद्योगिक पट्ट्यात ३१३ कॅमेरे बसविण्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू केले आहे. तळोजा तसेच महापे भागात या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कंट्रोल आणि कमांड स्थानकेही उभारली जात आहेत. या स्थानकांचा उपयोग नवी मुंबई पोलीस तसेच पनवेल महापालिकेला करून देण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने तयार केला आहे. अैाद्योगिक सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या या संपूर्ण प्रकल्पाचा उपयोग आता शहरी पट्ट्यांनाही होईल अशा पद्धतीची आखणी यानिमित्ताने केली जात आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सन १९७० मध्ये ८६६.९८ हेक्टर क्षेत्रावर तळोजा औद्योगिक क्षेत्र विकसित केले आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रात आतापर्यंत एकूण ९८५ भूखंडांचे आरेखन करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या धोरणाप्रमाणे येथे उद्योजकांना रस्ते, पाणीपुरवठा, सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पथदिवे यासारख्या सुविधा पुरविण्यात येतात. तसेच बँक, पोस्ट ऑफिस, दूरध्वनी केंद्र, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल यासारख्या सामायिक सुविधाही गेल्या काही वर्षांत या पट्ट्यात उभ्या करण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत तळोजा औद्योगिक क्षेत्रात मेसर्स दीपक फर्टिलायझर, असाही इंडिया टेक्नोव्हा, ओवेन्स कॉर्नीग, आय.जी.पी.एल. भारत इलेक्टॉनिक्स, हिंदाल्को, बॉम्बे ब्रेवरीज, व्ही. व्ही.एफ, पी.सी.एल. इत्यादी आंतरराष्ट्रीय पातळीचे लहान-मोठे उद्योग उभे आहेत.

तळोजा आणि ठाणे-बेलापूर अैाद्योगिक पट्टा नागरी वस्त्यांना खेटून असल्याने नवी मुंबई आणि पनवेल या दोन शहरांच्या सुरक्षा व्यवस्थेलाही या कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या नोंदीचे बळ मिळू शकते अशा स्वरूपाचा प्रस्ताव पोलीस आणि महापालिकेकडून पुढे आणण्यात आला होता. त्यानुसार तळोजा आणि महापे अैाद्योगिक पट्टयातील कंट्रोल आणि कमांड केंद्रात यापुढे नवी मुंबई पोलीस तसेच पनवेल महापालिकेला ॲक्सेस देण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे.

दोन्ही अैाद्योगिक पट्ट्यांत उद्योगांमार्फत सीसीटीव्हीचे जाळे विणण्यात आले असले तरी एमआयडीसीने आखलेले पहिल्या टप्प्यातील ३१३ सीसीटीव्ही प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्णत्वास आले आहे. या प्रकल्पामुळे तळोजा आणि महापे भागातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. हे करत असताना लगतच असलेल्या शहरांनाही त्याचा उपयोग व्हावा यासाठी हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती एमआयडीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली.

विमानतळामुळे तळोजा केंद्रस्थानी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यालगत उभ्या राहाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांपासून तळोजा अैाद्योगिक परिसर फारसा लांब नाही. त्यानुसार तळोजा औद्योगिक क्षेत्र हे स्मार्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यास प्रशासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४५० कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.