पनवेल : चार दिवसांपूर्वी कळंबोली सर्कल शेजारी उभ्या बल्कर चालकाला रात्रीच्या वेळेस वस्त-याचा धाक दाखवून लुटणा-या त्रिकुटाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या त्रिकुटाने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री बॅंक व्यवस्थापकाला लीफ्ट देण्याच्या बहाण्याने लुट केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. खांदेश्वर परिसरात वाढत्या गुन्ह्यांमध्ये नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांना रस्त्यावरील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी विशेष लक्ष्य देण्याचे आदेश दिले होते.
नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी याबाबत युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शिंदे व इतर पोलीस पथकाने खांदेश्वर व कळंबोली येथे घडलेल्या गुन्ह्यांविषयी तांत्रिक तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅंक व्यवस्थापक रात्रीच्यावेळी नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कल येथे रिक्षाची वाट पाहत असताना त्यांना लीफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्यात आले होते. या घटनेतील चोरट्यांचा शोध पोलिसांचे पथक घेत होते.
या दरम्यान १४ सप्टेंबरला रात्रीच्यावेळी तीन मुले बल्करमध्ये शिरले त्यांनी वत्स-याचा धाक दाखवून चालकाला लुटले. या दोन्ही घटनांमधील आरोपींचे वर्णन साम्य असल्याने पोलीस या आरोपींचा तांत्रिक तपास करत होते. पोलिसांनी विचुंबे गावात राहणा-या संशयीत आरोपी प्रथमेश तरे, साहील खैरे आणि विहिघर गावात राहणा-या समीर पेडणेकर यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशय़ीत आरोपींचे वय २३ ते २६ वर्षे आहे.
वाटसरूंना लुटणा-या तीघांपैकी दोन संशयीत आरोपी समीर आणि प्रथमेश हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मुंबईच्या काळाचौकी, आझादमैदान आणि वडाळा या तीन पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. हे तीघेही दिवसा नवी मुंबई येथील एका नामांकित रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे काम करत त्यानंतर त्यांनी रात्रीच्यावेळी वाटसरूंना लुटून मिळणारी रक्कम मौजमजेसाठी वापरत असल्याचे पोलिसांना सांगीतले.