नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत गस्ती पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. त्याच्या कडून २ लाख ८० हजार रुपयांचे एमडी हा अमली जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली असून या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजान इमाम शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. २५ वर्षीय रमजान हा तुर्भे इंदिरानगर येथे राहतो.
२२ तारखेला रात्री ११च्या सुमारास अंमली पदार्थ टास्क फोर्सचे गस्ती पथक एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी तुर्भे सेक्टर १९ पामबीच लगत असणाऱ्या महापारेशन कार्यालय समोर रमजान त्यांना दिसून आला. त्याच्या हालचाली संशयित वाटल्याने गस्त पथकाने त्याला हटकले असता तो घाबरला मात्र उसने अवसान आणून उडवा उडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याच्या बोलण्यात विसंगती आल्याने पोलिसांनी त्याला पकडून एपीएमसी पोलीस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी त्याची अंग झडती घेतली असता. त्याच्या कडे पांढऱ्या रंगाची भुकटी आढळून आली. त्याची तपासणी केली असता एमडी हा अंमली पदार्थ असल्याचे समोर आले. रमजानही ती भूकटी एम डी असल्याची कबुली दिली.
बंदी असणारा एमडी हा अमली पदार्थ आढळून आल्याने त्याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायाद्यातर्गत गुन्हा नोंद करीत रमजान याला तात्काळ अटक करण्यात आली. त्याच्या कडे २८ ग्रॅम वजनाचा २ लाख ८० किमतीचा एमडी हा अंमली पदार्थ, ४ हजार रुपयांचा मोबाईल, ५ हजार ७१० रुपयांची रोकड, असा एकूण २ लाख ८९ हजार ७१० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रमजानने हा अंमली पदार्थ कोठून आणि कोणासाठी आणला याची चौकशी सुरु आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
ज्या भागात रमजान पकडला गेला तो भाग एपीएमसी मार्केट एरिया म्हणून ओळखला जातो. आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून त्याचा नाव लौकिक असून या ठिकाणी राज्य सोबतच देशातील काना कोपऱ्यातून कृषी उत्पन्न मालाची आवक जावक होत असते. त्यामुळे अंमली पदार्थ, राज्य सरकारने बंदी घातलेला गुटखा, याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच एमडी हा पदार्थ उच्चभ्रू लोकांचीही पसंती असल्याचे अनेक कारवाईत समोर आलेले आहे. त्यात एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदा हुक्का पार्लर, पब आहेत. अधून मधून यावर कारवाई होते मात्र काही दिवसात ते पुन्हा सुरु होतात. एमडी सारख्या अंमली पदार्थांना अशा ठिकाणी ग्राहक मिळत असल्याचा संशय पोलिसांनी अनेकदा व्यक्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने गुरुवारी केलेल्या एका कारवाई २ लाख ८० हजार रुपयांचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त करीत एकाला अटक केल्याने पोलिसांच्या संशयाला पुष्टी मिळाली आहे.
