वादग्रस्त कारकीर्दीला विराम; संजयकुमार नवे पोलीस आयुक्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेखर हंप्रस, नवी मुंबई नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगराळे यांची बदली झाल्याने अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘साहेबांच्या बदली’च्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नगराळे यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यांनी आपले ‘वजन’ वापरून नवी मुंबईत ठाण मांडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत होती. आतापर्यंतच्या पोलीस आयुक्तांपैकी सर्वात वादग्रस्त कारकीर्द म्हणून नगराळे यांचा कार्यकाळ ओळखला जात आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्य़ांची तत्परतेने उकल झाली असली, तरीही त्यांचे काही निर्णय त्यांना वादग्रस्त ठरवून गेले.

हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये प्रभात रंजन यांच्याकडून नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला. आपल्या कारकीर्दीत नगराळे यांनी आयुक्तालयाचा कारभार उत्तम केला. मात्र काही प्रकरणांमुळे त्यांचे नाव चर्चेतही होते. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. याशिवाय लोकसंख्या वाढत असताना गुन्हेगारी कमी होत असल्याचा दावा ही केवळ आकडेवारी असल्याचीही कुजबुज खुद्द पोलीस वर्तुळातच सुरू होती. काही पोलीस ठाण्यांत तक्रारदारांना मिळणारी वाईट वागणूक रोखण्यात ते अपयशी ठरल्याचाही आरोप होत होता.

नगराळे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला पुरवण्यात येत असलेले संरक्षण काढून घेतले होते. या प्रकरणी त्या बांधकाम व्यावसायिकाने थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यावर न्यायालयाने नगराळे यांची कानउघाडणी केली होती. एवढी गंभीर प्रकरणे होऊनही नगराळे यांची बदली होत नसताना मराठा आंदोलनात केलेली ढिलाई त्यांच्या अंगलट आल्याची उघड चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे. पोलिसांचे हात बांधून ठेवल्यानेच आंदोलनाने दंगलीचे स्वरूप घेतले. एवढी दंगल उसळल्यानंतरही तळोजातील अतिरिक्त कुमक अखेपर्यंत वापरली गेली नसल्याचे खापरही त्यांच्या माथी फोडण्यात आले.

दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता पोलीस वर्तुळात अनेक महिन्यांपासून वर्तवण्यात येत होती. नगराळे यांची बदली नागपूर येथे झाली असून त्यांच्या जागी एस. पद्मनाथन यांची नियुक्ती झाल्याचे संदेश फेब्रुवारीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. तेव्हापासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती.

प्रभात रंजन यांच्याकडून पदभार स्वीकारल्यावर काही दिवसांतच त्यांनी कारवाई केलेला वन कॉइन घोटाळा सर्वाधिक गाजला. या प्रकरणाची पाळेमुळे त्यांनी खणून काढली आणि कित्येक कोटींची फसवणूक टाळली. हा घोटाळा विविध देशांतही झाला होता. फ्रान्स सरकारने एका परिसंवादात त्यांना आमंत्रित केले होते. तसेच देशात गाजलेल्या बँक ऑफ बडोदामधील दरोडय़ाची त्यांनी दोन दिवसांत उकल केली. वाशीतील दरोडा प्रकरणातही त्यांनी मोठे यश संपादन केले होते. हे करीत असताना १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा असो वा पॉप गायक जस्टीन बिबरचा कार्यक्रम अशा मोठय़ा कार्यक्रमांसाठी त्यांनी कायदा-व्यवस्था उत्तम ठेवली. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात नावाजली गेली. त्यांच्या काळात पोलीस दलाने अनेक सामाजिक कामेही केली. कामात कसूर करणाऱ्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केले, काहींना बडतर्फ केले, तर काहींची बदली केली.

सहआयुक्तपदी सुरेशकुमार

सहआयुक्तपदावर राज्य राखीव दलाचे विशेष महानिरीक्षक सुरेशकुमार मेकला यांची नियुक्ती झाली आहे. वाहतूक शाखा उपायुक्त नितीन पवार, साहाय्यक आयुक्त राजेंद्र माने, मुख्यालय उपायुक्त प्रवीण पवार यांचीही बदली करण्यात आली आहे. उपायुक्त सुनील लोखंडे व अशोक दुधे यांची नवी मुंबईत उपायुक्त पदावर नियुक्ती झाली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai police commissioner hemant nagrale transferred
First published on: 31-07-2018 at 01:31 IST