नवी मुंबई : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या नंतर आता त्यांच्या वडिलांचा प्रताप समोर आला आहे. रबाळे येथून सिमेंट मिक्सर वाहन चालक तरुणाचे अपहरण करणारे अज्ञात व्यक्ती अन्य कोणीही नसून पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरच असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिक्सर वाहन चालक प्रल्हाद कुमार (२२ वर्षं) व त्याच्या सहकाऱ्याशी अपघातानंतर नुकसानभरपाईच्या वादावरून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री मिक्सर वाहन चालक तरुण आणि दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूझर गाडीचा किरकोळ अपघात झाला. त्यावरून झालेल्या अपघातात गाडी घासली घेल्याने खेडकर यांनी नुकसानभरपाईची मागणी केली असता, चालकाने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा संताप आला आणि खेडकर यांनी थेट चालकाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगत जबरदस्ती गाडीत बसवले. मात्र, पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी चालकाचे अपहरण करत पुण्यातील स्वतःच्या घरात डांबून ठेवले.

पोलिसांची वेगवान कारवाई

सिमेंट मिक्सर वाहन चालकाच्या सहकाऱ्याने तत्काळ रबाळे पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने पोलिसांच्या तपासाला वेग आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पथक तयार करून गाडीचा मागोवा घेतला असता पूजा खेडकर यांच्या पुण्याच्या चतुःशृंगी हद्दीतील घरी पोलीस पोहोचले. पोलिसांनी अधिक तपास केला असता तरुणाला गाडीत डांबून पुण्यात नेणारे वाहन चालक आणि त्यांचे सहकारी हे अन्य कोणीही नसून हे पूजा खेडकर यांचेच वडील दिलीप खेडकर आणि त्यांचे अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालक तरुणाची सुखरूप सुटका केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

या कारवाईदरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना मदत करण्याऐवजी उलट अडथळे निर्माण केले. पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना देखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.

पुढील तपास सुरू

खेडकर कुटुंबीयांच्या वादग्रस्त कारवायांत आता थेट अपहरणासारखा गंभीर आरोप जोडला गेला आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे आणि आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रबाळे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे.