शहरबात : दर्जा घसरला

राहण्यायोग्य शहरात गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेले नवी मुंबई या वर्षी सहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहे.

नवी मुंबई

विकास महाडिक

राहण्यायोग्य शहरात गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेले नवी मुंबई या वर्षी सहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. शहरात सामाजिक, कायदा, सुव्यवस्था आणि पर्यावरण विषयक दर्जा घसरत असल्याचे लक्षण आहे. त्यात प्रदूषण ही मोठी समस्या निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे टाळेबंदीनंतर राजगारनिर्मिातीत मोठी घसरण झाल्याने शहरासाठी पसंतीक्रम बदलताना दिसत आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी मंत्रालयाने मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई हे शहर राहण्यायोग्य स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर असल्याचे जाहीर केले आहे. दोन वर्षांपूर्वी हेच शहर दुसऱ्या क्रमांकावर होते. केंद्रीय नागरी मंत्रालयाने देशातील हजारो शहरांचा अभ्यास करून जगणं सुलभ कोणत्या शहरात आहे ते शोधून काढले आहे. यापूर्वी राहण्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुणे शहर जाहीर करण्यात आले होते. त्या खालोखाल दुसरा क्रमांक हा नवी मुंबईचा होता. त्यावेळी नवी मुंबईकरांचा अभिमान भरून आला होता पण मागील वर्षी म्हणजे करोना काळात या मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई सहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे तर पुण्याची जागा बंगळुरुने घेतली आहे. त्यामुळे नवी मुंबई पहिल्या दहा क्रमांकात असल्याच्या आनंदापेक्षा हे आधुनिक, नियोजनबध्द शहर असे एकदम सहाव्या क्रमांकावर गेले कसे? पुणेकरांचा पहिला नंबर हुकला कसा याप्रमाणे नवी मुंबईकरांनाही दोन नंबर गेला कसे प्रश्न पडले आहेत.

देशातील स्मार्ट सिटींच्या या सर्वेक्षणात १४ निकष पाहिले गेले आहेत. त्यात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कायद्या, सुव्यवस्था, औद्योगिक, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविद्या या सर्व जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा सुविधांचा अभ्यास करण्यात आला आहे. या १४ निकषांमध्ये नवी मुंबईच्या पुढे आणखी पाच शहरे आहेत. त्याचा सामाजिक, कायदा, सुव्यवस्था आणि पर्यावरणविषयक दर्जा नवी मुंबईपेक्षा सरस आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. बंगळुरु या शहराचा अलीकडे अनेक पायाभूत सुविद्यांमध्ये वरचा क्रमांक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्यामुळे या शहरात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या असून येथील रहिवाशांची जीवनमान उंचावले आहे. विशेष म्हणजे शहराच्या अनेक भागात प्रदूषण कमी आहे. नवी मुंबईत हेच प्रदूषण आता चिंताजनक झाले आहे. खारघरमध्ये मोकळ्या जागेत ठेवलेली कृत्रिम फुफ्फुसे दहा दिवसात काळी पडलेली आहेत. दिल्लीत हा कालावधी केवळ सहा दिवस आहे. त्यानंतर नवी मुंबईचा क्रमांक लागत आहे. तळोजा एमआयडीसी मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. नवी मुंबई विमानतळासाठी झालेले उत्खनन आणि दगडखाणींचा खडखडाट हा येथील नागरिकांसाठी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातून जाणारे दोन महामार्ग या प्रदूषणात भर घालत आहे. बंगळुरु आणि पुण्यात रोजगार आणि राहणीमानाच्या जास्त संधी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे या शहरांना नवीन पिढी आता पहिली पसंती देत आहे.

या उलट नवी मुंबईतील रोजगाराच्या संधी कमी होऊ लागल्या आहेत. अनेक कारखाने हे स्थलांतरीत होत आहेत. जुन्या कारखान्यांच्या जागी आता माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी जागा घेतली असली तरी करोनानंतर घरातून काम करण्याच्या प्रणालीमुळे अनेक आयटी कंपन्या ओसाड पडू लागल्या आहेत. तेथील फर्निचर विक्रीसाठी काढले गेले आहे.

दळणवळणाची अनेक साधणे या नवी मुंबईच्या पुढे असलेल्या पाच शहरात उपलब्ध आहेत. याऊलट नवी मुंबईतील मेट्रो गेली दहा वर्षे रखडलेली आहे. जमीन संपादनाच्या अडचणीमुळे नेरुळ ते उरण हे रेल्वे मध्येच अडकली आहे. विमानतळाची घोषणा होऊन पंचवीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाली तरी हा प्रकल्प अस्तित्वात आलेला नाही. नवी मुंबई हे पुण्यानंतर एज्युकेशन हब म्हणून अस्तित्वात आले असले तरी आरोग्यात या शहराने मार खाल्ला आहे. काही खासगी रुग्णालये उभारली गेली आहेत मात्र सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर येथील आरोग्य सुविद्या आहे.

मुंबई, पुणे, ठाणे या शहरांना एक इतिहास आहे. नवी मुंबईला तो नाही. हे शहर भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र काही पायऱ्यांवर हे शहर अपयशी ठरत असल्याने ते पिछाडीववर पडत आहे. यात जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. तो दिसून येत नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानातही हे शहर गेली अनेक वर्षे गटांगळ्या खात आहे. राज्यात हे शहर सर्वात्तम असले तरी देशात नाही याची खंत नवी मुंबईकरांना नाही. शहराचा राहण्यास योग्य दर्जा केवळ पालिकेने दिलेल्या पायाभूत सुविद्यांवरुन ठरत नाही तर तो जनतेच्या सामाजिक, सांस्कृतिक रुची मधून ठरत असतो. येथील कायद्या सुव्यवस्था देखील या निकषामध्ये महत्वाची आहे. त्यामुळे सर्व शासकीय घटक व जनता ही या शहराला येत्या काळात राहण्यास सर्वात्तम शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास प्रयत्न करेल असा आशावाद आहे.

पालिकेचे काम नक्कीच चांगले

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराचा क्रमांक खाली गेला आहे. मात्र, या मानांकनाच्या निकषांतील बहुतांश घटनांत आपण चांगले गुण मिळवले आहेत.  शहरात नागरिकांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी आर्थिक स्रोत निर्माण करण्याची थेट जबाबदारी पालिकेची नाही. शहरात नागरी सुविधा देणे, राहण्यायोग्य वातावरण निर्माण करणे याबाबतीत पालिकेचे काम अन्य पालिकांच्या तुलनेत नक्कीच चांगले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navi mumbai ranking collapsed dd

ताज्या बातम्या