नवी मुंबई : राज्याते तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात एक राज्य एक गणवेशाबाबतचा घोळ कायम होता. शैक्षणिक साहित्य देण्याचे व त्याचे थेट खात्यात पैसे वर्ग होण्याच्या डीबीटी योजनचे पत्र नवी मुंबई महापालिकेने शाळा सुरू झाल्यानंतर २५ जुलैला सर्व शाळांना पाठवल्यामुळे यंदाही नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व शैक्षणिक साहित्य घोळ कायम आहेत. त्यामुळे यंदाही नवी मुंबई महापालिकेचे विद्यार्थी जुन्याच गणवेशात स्वातंत्र्यदिनाला ध्वजाला सलामी देणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये थेट लाभार्थी हस्तांतरण योजनेऐवजी ईरुपी प्रणालीचा पालिकेने अवलंब केला, त्यानंतर पुन्हा थेट लाभार्थी हस्तांतरण यंदा अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे सातत्याने बदलत्या धोरण चकव्याचा परिणाम शाळा, पालक, विद्यार्थ्यांवर होत असून शैक्षणिक वर्षातही शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा घोळ कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही महापालिकेचे अनेक विद्यार्थी स्वातंत्र्यदिनाला जुन्या शालेय गणवेशातच येणार आहेत. मागील अनेक वर्षापासून डीबीटी अर्थात विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे पालकांच्या थेट खात्यात वर्ग होण्याच्या योजनेत अनेक अडचणी येत होत्या.
पालिकेने शैक्षणिक साहित्य वाटपाबाबत बालवाडी, प्राथमिक विभाग तसेच माध्यमिक विभाग यांच्या साहित्यवाटपासाठी डीबीटीबाबतचे पत्र २५ जुलैला दिले आहे. त्यामुळे बूट, मोजे, दप्तर,रेनकोट,वह्या इतर साहित्य मिळणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभाग उपायुक्त संघरत्न खिल्लारे यांना याबाबत विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही.
पालिकेचा कारभार कासवगतीने सुरू आहे. इतर साहित्य देण्याचे पत्र शाळांना २५ जुलै महिना संपताना दिले जाते. त्यामुळे मुलांकडून माहिती व त्यांच्या खात्यात पैसे कधी जाणार व मुले साहित्य खरेदी कधी करणार त्यामुळे सरकारी यंत्रणा गरीबांच्या मुलांची चेष्टा करत आहेत. याला पालिका अधिकारीही जबाबदार आहेत.सुधाकर सोनवणे, माजी महापौर
नवी मुंबई महापालिकेमध्ये सातत्याने शिक्षण विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य व गणवेशाबाबत नेहमीच दिरंगाई केली जाते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या वाटपाबाबत पालिका अधिकारी शाळा सुरू होण्यापूर्वीच कार्यवाही का करत नाहीत. त्यांना जाब विचारण्यात येईल.सिद्धाराम शिलवंत, नवी मुंबई उपशहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष