नवी मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनांची आखणी सुरू झाली असताना नवी मुंबईत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकत्रितपणे विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका दिसणार आहे. पालिकेने महत्त्वपूर्ण प्रकल्पांची यादी तयार केली असून त्या प्रकल्पांच्या उद्घाटनाची पूर्वतयारी सुरू आहे.
महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या विकास कामांचा शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन बड्या नेत्यांना आमंत्रित करण्याचा बेत महापालिका प्रशासनाकडून आखला जात आहे. शहरातील स्थानिक राजकारणात हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. असे असताना वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मात्र या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते शहरात उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक आयोगाने पाच वर्षे रखडलेल्या निवडणुकांसाठीची कार्यवाही सुरू केली आहे. पालिका स्तरावर प्रभाग रचनेच्या कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १४ गावांसह मिळून प्रभाग रचना होणार असल्याने पालिकेच्या निवडणुक विभागामार्फत शहरात प्रभागरचनेची कामे वेगाने सुरू आहेत. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पूर्वी शहरात महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करुन त्या प्रकल्पांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्याचा राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
एकीकडे नवी मुंबईवर शहराचे सर्वेसर्वा वनमंत्री गणेश नाईक, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, तसेच शहरावर आपली पकड मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांच्या एकजुटीतून नवी मुंबई शहरातील महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करुन एकत्रित उद्घाटनांचा धडाका करण्याचा प्रयत्न आहे.
कोणत्या कामांचे एकत्रित उद्घाटन?
वाशी बस डेपो, नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण, पाणी पुरवठा योजनेच्या स्काडा प्रकल्पाचा शुभारंभ, बेलापूर टर्शअरी ट्रीटमेंट प्रकल्प लोकार्पण, घनकचरा संकलन व वाहतूक आयसीसीसी, नवीन ग्रंथालय, कॅन्सर रजिस्ट्री, नेरुळ रुग्णालयात मायक्रोबायोल़ॉजी, केमोथेरपी केअर सेंटर, वाशी रुग्णालयात नवजात अर्भक तपासणी, डिजिटल रेडीओग्राफी, वाशी व सीबीडी येथे डायलेसीस सेंटर, जुईनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालय, कोपरखैरणे येथील माता बाल रुग्णालय, ईआरपी ग्रिव्हान्स पोर्टल, आयटीएमएस बस, कोपरखैरणे धारण तलाव पुनरुज्जीवन, तुर्भे व दिघा इएसआर लोकार्पण, अग्निशमनच्या ६० मीटर क्षमतेच्या वाहनाचे लोकार्पण, आयटीएमएस सिग्नल व जाहिरात.