नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमा अंतर्गत(NMMT) महिला प्रवाशांसाठी मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू मार्गावरून महिलांकरिता विशेष वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या बस सेवा आज, गुरुवार १४ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहेत.
महिलांच्या प्रवासासाठी सुरक्षित, आरामदायी आणि जलद सेवा
नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या वतीने नवी मुंबई शहरासह मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात एकूण ७० बसमार्ग कार्यरत आहेत. यामध्ये २४ सर्वसाधारण आणि ४६ वातानुकूलित बस गाड्यांचा समावेश आहे. या बसमार्गांवरून दररोज २.२७ लाख प्रवाशी प्रवास करतात. पालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येते. या मुळे एन एम एम टीच्या बसे गाड्यांमधून दैनंदिन महिला प्रवाशांची संख्या सुमारे एक लाख इतकी आहे. दरम्यान महिलांकरिता बसमार्ग क्र. ११६ आणि ११७ वर ‘महिला विशेष’ बससेवा सुरू करण्यात आली आहे. आज गुरुवार, दिनांक १४ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत आहे.
एनएमएमटीच्या वतीने आवाहन
महिला प्रवाशांनी या विशेष सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. महिला विशेष बससेवा सुरू केल्यामुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर होणार असल्याचा विश्वास विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन महिला विशेष बससेवा
मार्ग आणि वेळ
- मार्ग क्र. ११६ : नेरुळ बस स्थानक – वर्ल्ड ट्रेड सेंटर – सकाळी ०८.०५
- वर्ल्ड ट्रेड सेंटर – नेरुळ बस स्थानक – सायंकाळी ०६:२५
- मार्ग क्र. ११७ : खारघर सेक्टर ३५ – वर्ल्ड ट्रेड सेंटर – सकाळी ०८.००
- वर्ल्ड ट्रेड सेंटर – खारघर सेक्टर ३५ – सायंकाळी ६.५०