नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या १७०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला जोडण्याचे काम होणार असल्याने शुक्रवारी सकाळी शहराला पाणीपरवठा करण्यात येईल परंतू शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत म्हणजेच १८ तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. पामबीच मार्गालगत सीवूड्स सेक्टर ४६ येथे अक्षर चौकात हे जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. अक्षर चौकात सततच्या पाणीगळतीमुळे नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला दोन्ही बाजूस जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात तसेच तसेच पालिका क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा तसेच सिडको क्षेत्रातील खारघर, कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. सुमारे १८ तास पाणीपरवठा बंद राहणार असून शनिवारी संध्याकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.
नवी मुंबई शहरात सीवूड्स विभागात नवीन पाइपलाइन टाकण्यात आली असून ती मुख्य जलवाहिनीला जोडण्याच्या कामासाठी शहरात १८ तासांचा शटडाऊन घेतला आहे. नागरिकांनी या काळात पाणी जपून वापरावे. योग्य ते सहकार्य करावे. – अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता.