उत्पन्नात प्रतिदिन पाच लाखांची घट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोट बाद करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा फटका नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेलादेखील बसला आहे. सुमारे ३३ लाख रुपये दिवसाला उत्पन्न मिळणाऱ्या परिवहन सेवेला आता २८ लाखांवर समाधान मानावे लागत आहे. सुमारे पाच लाख रुपयांचा दिवसाला तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती परिवहन सेवेच्या विश्वसनीय सूत्रांकडून देणयात येते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी ‘बस डे’ सारखे उपक्रम राबवले. मात्र, हजार, पाचशे रुपयांच्या नोटावर मागील आठवडय़ात बंदी घातल्यामुळे त्याचा फटका परिवहन सेवेलादेखील बसला आहे.
११ नोव्हेंबर पर्यंत पाचशे व हजार रुपयांच्या नोटा परिवहन सेवेकडून स्वीकारल्या जात होत्या. पण १२ नोव्हेंबरपासून हजार व पाचशे च्या नोटा स्वीकारणे परिवहन सेवेने बंद केल्यामुळे परिवहन सेवला त्याचा तोटा सहन करावा लागला आहे. सुमारे पाच लाख रुपये तूट होत आहे. दिवसाला दोन लाख पन्नास हजार रुपये उत्पन्न मासिक पासमधून परिवहन सेवेला होत होते.
परंतु पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्याने त्यामधील उत्पन्न वाढ होणे अपेक्षित होते. त्याचा परिणाम तूटमध्ये झाला असून ५० ते ६० हजार रुपयेच उत्पन्न परिवहन सेवेला मिळत आहे.
सुट्टे पैसे नसल्यामुळेदेखील प्रवासी घरांबाहेर पडत नसल्याची शक्यता परिवहन सेवेच्या सूत्रांकडून व्यक्त केली जाते. तर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा परिवहन सेवेकडून घेणे बंद केल्यामुळे वाहक व प्रवाशांमध्ये खटके उडत असल्याचे प्रकारदेखील घडले आहेत. सुट्टे पैसे असेल तरच परिवहन सेवेचे वाहक प्रवाशांना बसमध्ये चढण्यास सांगत असल्याने प्रवाशांची पंचाईत झाली आहे.