मैदानाच्या पाहणीदरम्यान बाब उघड; गस्त घालण्यासाठी पालिकेचे पोलिसांना पत्र
नवी मुंबई पालिकेच्या १६० उद्यानातील साठ टक्के उद्यानात रात्रीच्या वेळी तळीरामांचे अड्डे बसत असल्याचे आढळून आले आहे. ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईत होणाऱ्या जागतिक पातळीवरील फिफा फुटबॉल स्पर्धाच्या आयोजनानिमित्त पालिकेने सहा कोटी रुपये खर्च करून नेरुळ येथे विकसित केलेल्या एका मैदानाच्या पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना ही बाब आढळून आली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र पालिकेने पोलिसांना दिले आहे.
आयुक्त एन. रामास्वामी व अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी नुकतीच फिफाच्या नेरुळ सेक्टर २३ येथील सराव मैदानाची पाहणी केली. या वेळी या मैदानात रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून पालिकेची मैदाने व उद्याने रात्रीच्या वेळी तपासावीत, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती पामबीच येथील नेरुळ पॉण्डजवळील जॉगिंग ट्रकवरदेखील आहे. पालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांना दररोज या परिसरात खाली दारूच्या बाटल्या आढळून येतात, तर ऐरोली येथील चिंचवली उद्यानात रात्री उशिरा प्रवेश करणे कठीण होते. हाच प्रकार अनेक उद्यानात दिसून आला आहे. यासाठी पालिकेने काही उद्यानात सुरक्षारक्षक ठेवले आहेत, पण त्यांना मॅनेज केल्यानंतर ही पार्टी साजरी करणे सोपे जात असल्याची चर्चा आहे.
पोलिसांचा कानाडोळा
नवी मुंबईत सध्या रात्र जीवनाला सर्रास मुभा देण्यात आली असून हुक्का पार्लरांनी देखील डोके वर काढले आहे. तसेच शहरात लेडीज बारची छमछमदेखील पहाटे उशिरापर्यंत सुरू आहे. या सर्व अवैध धंद्यांना नवी मुंबई पोलिसांचा आशीर्वाद आहे. त्याचा फायदा घेऊन तळीरामांनी आता सर्वसामान्य नागरिकांना मोकळा श्वास घेण्यास असलेल्या जागांचाही ताबा घेतला आहे. मुंबईच्या तुलनेत नवी मुंबईत सिडकोने विकास नियंत्रण नियमावलीच्या नवीन नियमानुसार ४६ टक्के जमीन मोकळी ठेवली आहे. यात अनेक उद्याने व मैदाने विकसित केलेली आहेत. त्यातील काही उद्यानांचा, मैदानांचा तसेच काही मोकळ्या जागांचा उपयोग तळीराम करतात. नवी मुंबईत विविध क्षेत्रांची अनेक महाविद्यालये आहेत. त्यामुळे तरुणाईची संख्याही जास्त आहे. मोठी हॉटेल व बार अॅण्ड रेस्टारन्ट आर्थिकदृष्टय़ा न परवडणारे तळीराम खुलेआम मद्यपान करतात. तसेच अशा प्रकारे मद्यपान करणारे पोलिसांबरोबर आर्थिक व्यवहार करत असल्यामुळे खुलेआम मद्यप्राशनाला मुभा दिली जात आहे.