नवी मुंबई : नवी मुंबई मनपातील उद्यान विभागात काम करणारे कर्मचारी दसऱ्याच्या पूर्व संध्येला आमरण उपोषणास बसले असून किमान वेतन आणि लेव्ही दिली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. निदान सणाला तरी अधिकार्यांना पाझर फुटावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतील उद्यान विभागात कार्यरत कामगारांना किमान वेतन दिले जात नाही, यासाठी समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून कामगार आमरण उपोषण आंदोलन करत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर ते दिघा विभाग कार्यालय कार्य क्षेत्र क्षेत्रात एकूण १७लाख ५०३ चौरस मीटर क्षेत्रफळात उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. या उद्यानात कार्यरत कामगारांना किमान वेतन आणि लेव्हीचे सर्व फायदे देणे बंधन कारक आहे पण उद्यान विभागातील ठेकेदारांशी, उद्यान विभागातील उद्यान विभागातील अधिकार्यांचे आर्थिक हित संबंध असल्याने साधारण 40 कामगारांना किमान वेतन दिले जात नव्हते. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात होते. असा आरोप समता समाज समता कामगार संघाने केला आहे.
महानगरपालिकेच्या धोरणाप्रमाणे २ हजार २०० चौरस मीटर साठी एक कामगार याप्रमाणे १७ लाख ५०३ क्षेत्रफळासाठी ७७३ कामगार कार्यरत असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र उद्यान विभागात साडे चारशे कामगार कार्यरत आहेत उर्वरित २०० कामगारांचे वेतनाचे पैसे अधिकारी आणि ठेकेदार दरमहा वाटून घेत आहेत.
त्यातच जे कामगार कामाला आहेत त्यांनाही किमान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जे कामगार उपोषणास बसले आहेत त्यांना दरमहा बारा हजार रुपयेच वेतन मिळते, जर महानगरपालिका एका कामगारासाठी २७ हजार रुपये खर्च करत असेल आणि कामगाराला फक्त १२ हजार रुपये मिळत असतील तर उरलेले १५ हजार रुपये कोणाच्या खिशात जातात? असा सवाल उचलला जात आहे. त्यामुळेच उद्यान विभागाचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करून स्वत:चा खिसा गरम करून घेत आहेत.
वारंवार विनंती करूनही कामगारांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे कामगारांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून या उपोषणात २५ कामगारांचे वय ६० वर्षे पेक्षा जास्त आहे. त्यांना मधुमेह उच्च रक्तदाब आणि इतर आजार आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत कधीही खालवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामगारांच्या वारसांना किमान वेतन आणि लेव्हीचे फायदे मिळत नसल्याने उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समाज समता कामगार संघाचे सचिव मंगेश लाड यांनी दिली.