नवी मुंबईतील रस्ते, भुयारी मार्ग, पदपथांची दुरवस्था; शाळांच्या सुटीवरून संभ्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई सलग पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेनंतर पाऊस ओसरला असला तरी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या मात्र कायम आहे. सलग कोसळलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या व झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरातील काही ठिकाणी रस्ते, भुयारी मार्ग आणि पदपथांची दुरवस्था झाली. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी शाळांना सुटी असल्याचे जाहीर केले असले तरी पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी हा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा, असे पत्रक काढल्याने यावरून गोंधळावस्था पाहायला मिळाली.

शीव-पनवेल महामार्गावर मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले; परंतु मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र नव्हते; परंतु मागील चार दिवस सलग झालेल्या पावसाने महामार्गानजीकचे फुटपाथ वाहून गेल्याचे चित्र नेरूळ एसबीआय कॉलनीजवळ पाहायला मिळाले, तर पदपथावरील पेव्हर ब्लॉक्सही वाहून गेल्याचे चित्र होते.

महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी काही ठिकाणी पाहायला मिळाले, तर दुसरीकडे शहरातील महामार्गावर असलेले भुयारी मार्ग बिनकामाचे असल्याचे चित्र होते. वाशी गाव, नेरूळ एलपी, एसबीआय कॉलनी, उरण फाटा येथे असलेल्या भुयारी मार्गात पूर्ण पाणी साचले आहे, तर नेरूळ एलपी येथील दोन्ही भुयारी मार्गाचे शटरच बंद करून ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित केलेल्या या भुयारी मार्गासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च केले; परंतु वाशी वगळता इतर ठिकाणचे भुयारी मार्ग उपयोगात येत नसून पालिकेचा कोटय़वधींचा खर्च व्यर्थ गेला आहे. वाशीमध्ये शबरी हॉटेलजवळ एक झाड रस्त्यावरच कोसळले होते; परंतु पालिकेने तात्काळ या ठिकाणी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. शहरातील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या; परंतु मंगळवारी दुपारनंतर परिस्थिती अतिशय नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली. तुर्भे परिसरात पडलेल्या खड्डय़ांमुळे या परिसरात वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.

करावे भुयारी मार्गाचे तळे

करावे गाव येथील मच्छीमारांना पामबीच ओलांडून जाऊ  लागू नये म्हणून पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून करावे येथे भुयारी मार्ग बनवला; परंतु पहिल्याच वर्षी या मार्गात पाणी साचले आहे. महापालिकेने येथे पाणी उपसण्यासाठी पंप लावले आहेत, तरीही भुयारी मार्गात पाणी साचून मुले पोहण्याचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथील भुयारी मार्गाची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. करावे भुयारी मार्ग पावसाळ्यात बिनकामाचे ठरले असून पालिकेने योग्य ती उपाययोजना करावी, असे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी  सांगितले.

शहरात मंगळवारी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत खूप पाऊस झाला; परंतु कोठेही अडचण निर्माण होऊ  नये यासाठी संपूर्ण पथक कार्यरत होते. पाऊस जोरात पडलेला असला तरी मोरबे धरणातील पाण्याची स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे दर मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

– डॉ. रामास्वामी एन., पालिका आयुक्त

मंगळवारी सकाळपर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे हार्बर मात्र पूर्ण कोलमडली होती. काही गाडय़ा पनवेल ते वाशी, तर काही पनवेल ते मानखुर्द मार्गावर सुरू होत्या. सीएसएटीकडे जाणारी आणि येणारी वाहतूक मात्र रुळांवर पाणी साचल्याने बंद होती; परंतु ट्रान्स हार्बर व नेरूळ खारकोपर मार्गावरील वाहतूक सुरू होती.

– अनिल जैन, साहाय्यक जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Normal life hit after heavy rains lashing for five days in navi mumbai zws
First published on: 03-07-2019 at 04:48 IST