अरबी समुद्रात मुंबईनजीक असलेल्या बुचर (जवाहर) बेटावरील तेलाच्या टाकीला आग लागल्याच्या पाश्र्वभूमीवर उरणच्या सुरक्षेचा आणि पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुचर बेटापेक्षा अधिक साठा उरणमधील ओएनजीसी, जेएनपीटी, आयओटीएल आणि खासगी तेल कंपन्यांनी केला आहे. भारत पेट्रोलियम कंपनीचा घरगुती गॅससाठाही आहे. त्यामुळे ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेल्या उरणच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर समुद्राच्या तळाशी ४० वर्षांपूर्वी कच्च्या तेलाच्या विहिरींचा शोध लागला. या तेलविहिरींतील कच्चे तेल उरणच्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावरील ओएनजीसीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात तेलवाहिनीद्वारे आणले जाते. दररोज लाखो लिटर कच्चे तेल आणले जाते. या तेलावर प्रक्रिया करून डिझेल, पेट्रोल, गॅस, केरोसीन तसेच इतर इंधने मिळवली जातात. त्यांचे वाटप शेकडो किलोमीटरवरील विविध कंपन्यांना तेल व गॅसवाहिन्यांतून केले जाते. यात अतिज्वलनशील नाफ्त्याचाही समावेश असतो. हे सर्व ज्वलनशील पदार्थ साठवण्यासाठी लाखो लिटरच्या टाक्या प्रकल्पात उभारण्यात आल्या आहेत. ओएनजीसीमधील गॅस भारत पेट्रोलियमच्या घरगुती गॅस भरणा संयंत्रात पाठविला जातो. तसेच वायूवर आधारित येथील वीजनिर्मिती केंद्रालाही त्याचा पुरवठा केला जातो आहे.

दुसरीकडे जेएनपीटी बंदरात भारत पेट्रोलीयम, इंडियन ऑइल, रिलायन्स, हिंदुस्थान पेट्रोलीयम आदी कंपन्यांसाठी जहाजातून दररोज लाखो लिटर पेट्रोल, डिझेल, नाफ्ता तसेच इतर तेलजन्य पदार्थ आयात केले जातात. या आयात केलेल्या पदार्थाची साठवणूक जेएनपीटीच्या टँक फार्ममध्ये केली जाते, तर आयओटीएल या कंपनीने धुतूम येथे मोठे टँक फार्म उभारले आहे. या टाक्यांपर्यंत बंदरापासून तेलवाहिन्या टाकल्या आहेत. तिथे इंधनांचा साठा केला जात आहे. टँकरमध्ये भरून हे तेल मागणीनुसार देशभर पाठविण्यात येते. अशा प्रकारच्या तेलाची हाताळणी करण्यासाठी शेकडो टाक्या उरणच्या विविध भागांत बांधण्यात आल्या आहेत. तसेच तेल व गॅसवाहिन्यांचेही जाळे पसरलेले आहे. या तेलामध्ये अतिज्वलनशील पदार्थाचाही समावेश आहे; परंतु ही हाताळणी करताना तेलाने पेट घेतल्यास जी भयावह परिस्थिती निर्माण होईल, तिचा सामना करण्यासाठी सुसज्ज अग्निशमन दलाचा उरणमध्ये अभाव आहे. त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला अपुऱ्या साधनांनिशी झटावे लागत आहे.

तेलाच्या आगीवर नियंत्रण आणून ती विझविण्यासाठी पाण्याचा उपयोग करता येत नाही. त्यासाठी फोम वापरावा लागतो. तो महाग असल्याने त्याचाही पुरेसा पुरवठा या भागात होत नाही. उरण परिसरात नौदल, ओएनजीसी, जेएनपीटी व सिडको अशी चार अग्निशमन केंद्रे आहेत; परंतु त्यांच्या आधुनिकीकरणाची गरज आहे. त्यांच्याकडील साधनसामग्री आणि मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे, अन्यथा बुचर बेटाप्रमाणे उरण परिसरात तेलाला आग लागल्यास ती आटोक्यात आणणे अशक्य होईल.

जेएनपीटी बंदरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत जाणाऱ्या तेलवाहिनीला छिद्र पाडून त्यातून डिझेलची चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे. तसेच भारत पेट्रोलीयम प्रकल्पातून गॅस वाहून नेण्यासाठी देशभरातून शेकडो गॅसचे टँकर येतात. या टँकरच्या खाली स्टोव्ह लावून अन्न शिजविले जाते. त्यामुळे भडका उडूनही गॅसचा स्फोट होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. उरणमध्ये अशा प्रकारच्या तेलाच्या आणि ज्वलनशील वायूंच्या साठय़ात दिवसागणिक वाढ होत आहे आणि ती होत राहणार आहे. बंदरातून आयात करण्यात येणारा साठाही वाढणार आहे. त्यामुळे मुंबईलगतच्या बुचर बेटावरील तेल टाकीला आग लागल्याच्या पाश्र्वभूमीवर आता उरणमधील तेलसाठय़ांची सुरक्षा मजबूत करण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास उरणमध्येही तेल व तेलजन्य पदार्थ तसेच ज्वलनशील वायूंचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उरण परिसराचे त्याचबरोबर शेजारीच असलेल्या मुंबई व नवी मुंबईतील नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची भीती आहे. अशी स्थिती असताना ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या धर्तीवर शासनाने तसेच येथील तेल कंपन्यांनी सुरक्षेचा उपाययोजना बळकट करणे अपरिहार्य ठरणार आहे.

उरणमधील दुर्घटना

उरणमधील ओएनजीसी प्रकल्पात अनेकदा तेलगळती झाल्याने आग लागली आहे. यात सर्वात मोठी घटना २००७ साली जुलैमध्ये घडली. ओेएनजीसीच्या प्रकल्पात असलेल्या अतिज्वलनशील नाफ्त्याच्या टाकीला गळती लागली. ही गळती लागल्यानंतर त्यातील नाफ्ता प्रकल्पाच्या नाल्यातून शेजारीच असलेल्या नागाव गावातील शेजारी असलेल्या नाल्यात वाहून आला होता. नाल्यातील पाण्यावर नाफ्ता तरंगत होता. गावकऱ्यांना याचे गांभीर्य माहीत नव्हते. सकाळी दोन व्यक्ती विडी पेटवत असताना नाफ्त्याला आग लागली आणि ती संपूर्ण परिसरात पसरलेली. यात दोघांचा मृत्यू झाला. तसेच ही आग विझविण्यासाठी १२ तासांपेक्षा अधिक कालावधी लागला.

आयओटीएल या कंपनीतील नाफ्त्याच्या वाहिनीला छिद्र पाडून त्यातून ज्वलनशील नाफ्ता चोरला जात होता. त्या वेळी त्याला आग लागली आणि दोघांचा भाजून मृत्यू झाला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oil company major threat to uran taluka
First published on: 10-10-2017 at 03:43 IST