नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा बटाटा बाजारातील नळ जोडणी २०  जून पासून खंडित केली होती. मात्र २० जून पासून ते आत्तापर्यंत पाण्याविना बाजारातील माथाडी, व्यापारी आणि इतर बाजार घटकांची कुचंबना होत होती. त्यामुळे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगार, व्यापारी यांच्या समवेत धडक मोर्चा देत पाणी पुरवठा पूर्ववत करा नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी लवकरच कांदा बटाटा बाजाराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले.

सन २००५ पासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या  कांदा बटाटा बाजार धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. गेले कित्येक वर्षांपासून या बाजार समितीचा पुनर्विकास रखडला आहे. मागील वर्षी ही कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास लवकर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र अद्यापही तो प्रश्न प्रलंबित आहे. तर दुसरीकडे येथील व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने स्थलांतराचा विषय ही अधांतरीच आहे. त्यामुळे अति धोकादायक यादीत समाविष्ट होऊन देखील पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने व्यापारी गाळे रिकामे करण्यासाठी तयार  होत नाहीत. त्यामुळे धोकादायक इमारती कशा खाली करायच्या ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरवर्षी नवी मुंबई महानगरपालिका एपीएमसीला धोकादायक इमारतींची नोटीस पाठवत असते. यंदाही नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ही नोटीस देण्यात आली असून ३० वर्षे जुन्या इमारतींचे संरचना परीक्षण देखील करण्याची नोटीस बजावली आहे. परंतु त्याच दरम्यान दुसरीकडे अति धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा बटाटा बाजार, मॅपको मार्केट आणि मसाला बाजार तसेच प्रशासकीय इमारतीतील नळ जोडणी खंडित केली होती.

हेही वाचा >>>प्रकल्पग्रस्तांची पुन्हा नैनाविरोधी हाक… ; एक जुलैपासून आंदोलन

२०जूनला ही कारवाई करण्यात आली होती, तेव्हा पासुन  सोमवारी पर्यंत येथील बाजार घटकांचे पण्याविना हाल होत आहे. येथील व्यापारी, माथाडी, महिला कर्मचारी पाणी उपलब्ध नसल्यास काम कसे करणार? त्यामुळे या विरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सोमवारी बाजार घटकांना एकत्रित करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा देत लवकर पाणी सुरू केले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्त यांनी लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कांदा बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजू मणियार यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुनर्विकासात लक्ष केंद्रित केले पाहिजे.  या ठिकाणी व्यापारांचा देखील फायदा झाला पाहिजे, अशा पद्धतीने पुनर्बांधणी करावी.  तसेच माथाडी कामगारांसाठी या पुनर्बांधणीतुन विश्रामगृह ही उभारावे आणि एपीएमसी मधील व्यापार वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.- नरेंद्र पाटील, माथाडी नेते