पनवेल : कारागृहातून जामीनावर सुटलेल्या खूनातील आरोपीने पनवेल शहरातील एका खोलीत बेकायदा शिरला. ही इमारत स्वताची असून या खोलीतून बाहेर पडणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे पोलीस व त्या आरोपीमध्ये झटापट झाली. आरोपीने कु-हाड व कोयत्याचा वापर करून पोलिसांवर हल्ला केल्याने या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. तर काहींना किरकोळ मार लागला. हा प्रकार बुधवारी रात्री आठ ते साडेअकरापर्यंत जुने पनवेल तहसीलदार कचेरीसमोरील मंगला निवास या इमारतीमध्ये घडला.

या प्रकरणातील संशयीत आरोपीचे नाव सोबन बाबुलाल महातो असे आहे. ३५ वर्षीय सोबन याने बुधवारी साडेआठ वाजता मंगला निवास या इमारतीमधील खोली क्रमांक ४०१ चे कुलूप तोडून कु-हाड व कोयता घेऊन घरात प्रवेश केला. ही संपुर्ण इमारत त्याची स्वताची असल्याने कोणी अडवल्यास त्यांना ठार मारेन असे तो तेथील रहिवाशांना सांगत होता. सोबनचा हा आरडओरडा शेजारील रहिवाशांनी एेकल्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली. काही वेळाने लगेच पनवेल शहर पोलिसांना तिथे बोलावण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल यांना याघटनेची माहिती मिळतात. ते काही क्षणात घटनास्थळी पोहचले. काही मिनिटांतच तेथे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले हे सुद्धा आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे, प्रविण फडतरे आणि पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पतवार, अनंत परागे आणि पोलीस कर्मचा-यांची कुमक तेथे पोहचल्यानंतर त्यांनी सोबनला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर तो पोलीसांच्या अंगावर धावून गेला. हातातल्या कु-हाडीने सोबन याने दोन पोलीस कर्मचा-यांवर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. या दरम्यान इतर पोलिसांची कुमक तेथे आली.

पोलिसांनी सोबनसोबत इतर त्याचे नातेवाईक त्याच घरात होते. त्यांना घराबाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र सोबन याने नातेवाईकांना घराबाहेर पाठविण्यास मनाई केली. सोबन सोबत त्या घरात त्याचे आईवडील, भाऊ आणि भावाची मुले होती. एवढ्यावरच सोबन थांबला नाही त्याने पोलिसांनी पकडू नये म्हणून भावाच्या १६ वर्षांच्या मुलीला ओलीस ठेवले. या मुलीच्या गळ्यावर कोयता लावून पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास तीला ठार मारून टाकू अशी धमकी दिली. माथेफीरू सोबनने पोलीस कर्मचारी सम्राट डाकी आणि रविंद्र पारधी यांना जखमी केल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पोलीस कर्मचारी माधव शेवाळे आणि साईनाथ मोकल यांना सुद्धा किरकोळ मारहाण सोबन यांनी केली. रात्री उशीरा सोबनला अटक करण्यात पोलिसांना यश आले.