पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या ‘पनवेल कनेक्ट’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल ६३ ऑनलाइन विविध सेवा घरबसल्या मिळणार आहेत. या ॲपचे लोकार्पण रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दि. बा. पाटील विद्यालयात करण्यात आले.

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या ॲपमुळे नागरिकांना पालिका सेवेची हमी मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिक पालिकेच्या विविध सेवा, तक्रारी, कर भरणा, सरकारी योजना, स्थानिक बातम्या व नागरी समस्या याबाबत माहिती व सुविधा मिळवू शकतात. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी ॲपमध्ये २४ तास आपत्ती व्यवस्थापन केंद्र उपलब्ध असणार आहे. पोलिस, अग्निशमन व रुग्णवाहिका यांसारख्या सेवाही या ॲपमधून मिळू शकतील.

शहरातील मुख्य चौकांमध्ये डिजिटल फलकांची स्थापना करण्यात आली असून, यावरून सरकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल. या उपक्रमांमुळे महापालिका आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होणार असून, ‘पनवेल कनेक्ट’ ॲप ही डिजिटल युगातील एक महत्त्वाची पायरी ठरणार असल्याचे पालिका आय़ुक्त चितळे यांनी सांगितले.

यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, स्वरुप खारगे व पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजगार मेळावा

या कार्यक्रमात महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४० कंपन्यांनी सहभाग घेतला. एकूण ३,५०० उमेदवारांनी नावनोंदणी केली होती. यातील १,७३६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून ८७२ उमेदवारांची निवड करण्यात आली, तर २१३ उमेदवारांना त्वरित नियुक्तीपत्रे देण्यात आली. तांत्रिक प्रशिक्षणासाठी ६१४ उमेदवारांची निवड झाली, ज्यात दोन अपंग उमेदवारांचाही समावेश होता. मेळाव्यात नियुक्तीपत्र दिलेल्या एका उमेदवाराला सर्वाधिक पॅकेज प्रतिवर्ष २.४ लाख रुपयांचे कंपनीने दिले.