पनवेल : पनवेलमध्ये विजेवरील वाहन खरेदी करण्याचे प्रमाण वाढत असले तरी महापालिका प्रशासनाने अजूनही विजेवरील वाहनांसाठी चार्जिंग स्थानक उभारलेले नाही. महापालिकेच्या स्वमालकीच्या चार चार्जिंग स्थानकांसाठी निविदा प्रक्रियाच सुरू आहे. परिणामी या स्थानकांसाठी पनवेलकरांची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे नाहीत.
महापालिकेच्या सभागृहातील सदस्यांनी चार्जिंग स्थानक उभारणीसाठी ठराव मंजूर केला होता. मात्र त्या ठरावानूसार निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने चार ठिकाणी स्वमालकीचे स्थानक उभे करण्याचे धोरण आखले. अजूनही निविदा प्रक्रिया पार पडलेली नाही. त्यानंतर ही स्थानके उभारण्यात येतील. त्यामुळे विज वाहन मालकांना पनवेलमधील महापालिकेच्या चार्जिंग स्थानकासाठी अजून काही महिन्यांची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पनवेल महापालिकेमध्ये निवडून आलेले सदस्यांनी इई वाहनांसाठी बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या धोरणावर ई चार्जिंग स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला होता. खासगी भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या स्थानकांसाठी महापालिका प्रशासनाने दोनवेळा स्वारस्य निविदा मागवल्या, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी ई-वाहनांसाठी महापालिकेचे स्वमालकीचे चार्जिंग स्थानक उभारण्याचा निर्णय़ घेतला. पनवेलमध्ये दीड हजारांहून अधिक विजेवर धावणाऱ्या मोटारी व पाच हजार दुचाकी आहेत. तीनशेहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विजेवरील वाहनांसाठी ई-चार्जिंगसाठी स्वतंत्र जोडणी देण्याचे निर्देश आहेत. मात्र अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी याकडे पाठ फिरवली आहे.
पालिकेने यासाठी चार विविध प्रभाग समितींमध्ये चार वेगवेगळ्या जागांवर चार्जिंग स्थानकांसाठी जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉल समोर किंवा स्कायवॉकशेजारी, कामोठे येथील उड्डाणपुलालगत, कामोठे वसाहतीमध्ये सेक्टर २१ येथील मैदानाशेजारी आणि वडाळे तलावाशेजारी ही स्थानके उभारण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू आहे. या स्थानकामध्ये दोन चारचाकी वाहने आणि एक दुचाकी एकाचवेळी उभी करुन चार्जिंग करु शकतील एवढी जागा असणार आहे.
नवी मुंबईत तीनच चार्जिंग स्थानक कार्यान्वित
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या नेरुळ, तुर्भे आणि कोपरखैरणे या तीन ठिकाणी विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्थानक कार्यान्वित असून, आणखी सात नव्या ठिकाणी अशा स्थानकांच्या उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली.
नेरुळमधील ‘ज्वेल्स ऑफ नवी मुंबई’ मॉलजवळील चार्जिंग स्थानक हे महापालिकेचे पहिले सार्वजनिक स्थानक असून त्याचे उद्घाटन ५ जून २०२५ रोजी, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले. या ठिकाणी ३० किलोवॅट क्षमतेचे दोन ‘सीसीएस-२’ प्रकारचे फास्ट चार्जर कार्यरत आहेत. हे स्थानक २४ तास खुले असून, मोबाईल अॅपद्वारे आगाऊ बुकिंग, सुरक्षित पार्किंग व्यवस्था आणि अग्निशमनसह अन्य मूलभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत.
तुर्भे आणि कोपरखैरणे या ठिकाणीही चार्जिंग स्थानके कार्यरत आहेत. तुर्भेतील स्थानक हे खासगी भागीदारीत उभारले गेले असून येथे एसी व डीसी दोन्ही प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत. वाहनचालकांना ‘चार्जग्रिड’ यासारख्या ॲपद्वारे स्लॉट बुक करण्याची सुविधा मिळते. कोपरखैरणेतील स्थानकही सार्वजनिक वापरासाठी खुले आहे.
विजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरात चार्जिंग स्थानकांचा विस्तार करणे गरजेचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने एकूण १२४ चार्जिंग स्थानकांची योजना आखली असून त्यापैकी २३ ठिकाणी प्रथम टप्प्यात उभारणी सुरू आहे. त्यामध्ये सध्या सात ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू असून ही स्थानके लवकरच कार्यान्वित होणार आहेत.