पनवेल – पनवेल परिसरात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांमुळे शहरात सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. पहिली घटना पनवेल शहरात पळस्पे फाटा येथे तसेच दूसरी घटना नवीन पनवेल येथील सेक्टर ४ येथे घडली.
पहिल्या घटनेत पळस्पे येथील दत्त स्नॅक्सजवळ आणि पीके वाईन्सच्या शेजारी असलेल्या टायर गोदामात लागली. दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे परिसर दाट काळ्या धुराने व्यापला. टायर्समुळे आग झपाट्याने पसरली होती. पनवेल अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, दुसरी घटना नवीन पनवेल उपनगरातील सेक्टर ४ मधील कॉटेज एनजी प्लॉट क्रमांक ८९ येथे सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणी घराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. गॅलरीतून आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने अग्निशमन दलाने दरवाजा तोडून आत प्रवेश करून आग विझवली. घरात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने ॲम्बुलन्समधून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र विजेच्या धक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच वरच्या मजल्यावर अडकलेल्या एका कुत्र्याचीही जवानांनी सुखरूप सुटका केली.
तसेच चार दिवसापूर्वी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कामोठे येथे मायलेकींचा घरात आगीत होरपळून मृत्यू झाला होता. अल्पावधीतच पनवेल परिसरात सलग तीन आगीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
