पनवेल : नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वेस्थानकासमोरील वाहनतळावर अवघ्या ३० रुपयांच्या पार्किंग शुल्काच्या वादातून झालेल्या तुंबळ मारहाणीने प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. या घटनेत रिक्षाचालक आणि पार्किंग शुल्क वसुल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दुखापत झाली असून दोन्ही गटातील तरुणांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कळंबोलीतील सेक्टर ४ मध्ये राहणारे ३४ वर्षीय रिक्षाचालक दररोज स्वतःची रिक्षा मानसरोवर स्थानकाजवळील वाहनतळावर उभी करून मुंबईला कामावर जातात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा तरुण गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता कामावरून घरी परत आल्यावर त्यांनी वाहनतळामधून स्वताची रिक्षा काढत असताना शुल्क वसुली करणाऱ्या तरुणाने ३० रुपयांची मागणी केली. मात्र, रिक्षाचालकांनी ” काही वेळे पूर्वीचे तुमच्या सहकाऱ्याला पैसे दिले आहेत” असे सांगताच पार्किंग शुल्क वसुल करणारे व रिक्षाचालक तरुण यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. दोन्ही गटांतील तरुण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.कामोठे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका खरटमल यांनी जखमींना वैद्यकीय मदतीचे आवाहन केले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या.
या वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला असला तरी मारहाण झालेली जागा कॅमेऱ्याच्या कक्षेबाहेर असल्याने घटनेचे ठोस पुरावे पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत. तरीही पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.सिडको मंडळाने मानसरोवर आणि खांदेश्वर स्थानकांजवळील मोकळी जागा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आरक्षित केल्याने तेथील अधिकृत वाहनतळ रद्द झाला आहे. परिणामी, प्रवाशांना वाहन रस्त्यावर पार्क करावी लागतात. त्यातूनच ठेकेदारांना पार्किंग शुल्क वसुल करताना वारंवार वाद निर्माण होतात. अनेक दुचाकीस्वार शुल्क न देता वाहन उभे करतात, अशी तक्रारही ठेकेदारांकडून केली जाते.फक्त १५ ते ३० रुपयांच्या शुल्कावरून सतत होणारे हे वाद आणि मारहाणीच्या घटना पाहता वाहनतळाच्या व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शक शुल्क वसुलीसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.