नवी मुंबई : ठाणे बेलापूर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून यात घणसोली रबाळे या उड्डाणं पुलावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. या खड्ड्याची तात्पुरती डागडुजी सुरु असली तरी मनुष्य बळ कमी असल्याने वाहतूक पोलिसांनी पुढे होत हातात फावडे घेत खड्डे बुजवले आहेत. ऐन गर्दीची वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी स्वतः काम सुरु केल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांनीही त्यांचे कौतुक केले.
नवी मुंबईतून ठाणे बेलापूर हा महामार्ग जातो. हाच मार्ग पुढे शीव पनवेल आणि नंतर मुंबई व्यतरिक्त महाराष्ट्र जोडत असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यात एमआयडीसी लगत हा मार्ग असल्याने जड अवजड वाहने तसेच नाशिक मुंबई गुजरात औद्योगिक वसाहत वाहतूक याच मार्गांवरून होत असते त्यामुळे रात्रीही हा मार्ग व्यस्त असतो. अशात या मार्गांवर गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या सततधार पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यात घणसोली ते रबाळे या नवी मुंबईतील सर्वात मोठ्या उड्डाणं पुलावर डांबरी रस्ता असल्याने खड्डे प्रचंड पडले आहेत.
त्यामुळे वाहतूक कोंडी गर्दीच्या वेळी मोठी होत असते.
काही दिवसापासून खड्डे तात्पुरते बुजवण्याचे काम मनपा करत आहे. मात्र त्याचा वेग अत्यंत कमी आहे. त्यात आज सकाळी गर्दीच्या वेळी वाहने वाढत असताना काही ठिकाणी खड्डे बुजवले तर एका मार्गीकेची तुंबलेली वाहतूक सुरळीत होऊ शकते हे लक्षात येताच वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक हवालदार सुनील नरळे आणि स्वप्नील काशीद यांनी हातात फावडे घेत खड्डे भरणे आणि स्तर सारखा करणे सुरु केले. त्यामुळे काही वेळातच त्या मार्गीकेवरील खड्डे तात्पुरते का होईना बुझवले गेले आणि वाहने तेथून सुसाट निघाले. वाहतूक पोलीस खड्डे बुझवत असताना अनेक वाहन चालकांनी जाता जाता अंगठा दाखवत तर काहींनी सलाम ठोकत त्यांचे कौतुक केले.