नवी मुंबई : उरण, जेएनपीटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ , उलवा या परिसरात सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर अनधिकृतपणे राडा रोडा टाकणारे, नैसर्गिक माती उत्खनन करुन त्याची चोरी करणे, अनधिकृतपणे टाकलेल्या डेब्रीजचा भराव पसरवून भरावाचे सपाटीकरण करुन अतिक्रमण करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा लोकांवर कठोर कारवाईचे पाऊले उचलण्यात येत आहे.
नवी मुंबई सिडको संपादित भागावर अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प येत असल्याने समाज विघातक घटक अवैध मार्गाने पैसा कमावण्यासाठी कायदा हातात घेत आहे. त्यात मोकळ्या जमिनीवर बाहेरून आणून राडा रोडा टाकणे, त्याचे सपाटीकरण करून अतिक्रमण करणे, नैसर्गिक माती उत्खनन करून माती चोरी करणे, आदी प्रकारात वाढ होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सिडको मुख्य दक्षता अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सिडको महामंडळातील अभियांत्रिकी विभागातील अधिकारी सुरक्षा विभाग अधिकारी , सुरक्षा रक्षक आणि दक्षता समिती मार्फत मोहीम राबविण्यात येत आहेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई : शाळा सुरु, शाळाशाळांमध्ये स्वागतोत्सव; मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
सप्टेंबर पासून आजपर्यंत ४१ ट्रक, १ जेसीबी, १ पोकलन, जप्त करण्यात आले आहेत. तसेच राडा रोडा टाकणारे जप्त गाड्यांचे चालक मदतनीस , अशा ४७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय या भागातून आता पर्यंत १ कोटी ३० लाख, ७५ हजार रुपयांची माती चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईट वर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.