नवी मुंबई : मुंबई एपीएमसी बाजारात गेल्या काही दिवसांत भाज्यांची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. छठ पर्वामुळे बहुतांश उत्तर भारतीय असलेले किरकोळ विक्रेते आपापल्या मूळ गावी गेल्या कारणाने भाजीपाल्याला उठाव नाही. त्यामुळे बाजारात खरेदी घटल्याने व्यापाऱ्यांचा माल पडून राहत आहे. सुमारे २५ ते ३० टक्के भाजीपाला विकला जात नसल्याने व्यापाऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
वाशीतील मुंबई एपीएमसीचा भाजीपाला हा नवी मुंबई पुरता मर्यादित नसून मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर उपनगरातही या भाजीपाल्याचा पुरवठा होतो. परंतु, दिवाळीनंतर आलेल्या छट पूजेचा प्रभाव भाजीपाला बाजारावर पडल्याचे व्यापारी सांगत आहेत. विशेषतः मुंबई-ठाण्यातील किरकोळ भाजीपाला विक्रेते हे मुख्यतः उत्तर भारतीय असून, छठ पर्वा दरम्यान या किरकोळ विक्रेत्यांनी पाठ फिरवल्याने बाजरातील बहुतांश भाजीपाला विकला न गेल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. बाजारात खरेदीदारांची गर्दी ओसरल्याने शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाला उठाव मिळत नसल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.
घाऊक भाजीपाला बाजारात मंगळवारी एकूण १७४४९ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. त्यामुळे भेंडीचे दर ५६-६० वरून ३६ ते ४० रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. तर गवार ७०-९० वरून ५०-७० रुपये किलोवर आला आहे. त्याशिवाय टोमॅटो १०-१४ रुपये किलो, फ्लॉवर ८-१२ रुपये किलो, फरसबी ३४-४४ रुपये किलो, वांगी १६-२२ रुपये किलो, शेवगा ५०-७० रुपये किलो, मेथी १६-२० जुडी, पालक १०-१८ रुपये जुडी, कोथिंबीर ८-१० रुपये जुडी असा दर पालेभाज्यांना मिळाला आहे.
घाऊक बाजारात दर घसरल्याने किरकोळ बाजारातही याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र तोट्याचा फटका बसत आहे.
दर कोसळल्याने बाजारात उत्साह कमी आहे. विक्री न झालेल्या मालामुळे व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे, येत्या काळात थंडी वाढल्यानंतर भाजीपाल्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.- कैलास ताजणे, भाजीपाला व्यापारी, मुंबई एपीएमसी
