पनवेल : बहुप्रतिक्षीत असलेल्या नवी मुंबई मेट्रोचा लोकार्पण सोहळा नवरात्रोत्सवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जात आहे. यासाठी गुरुवारी खारघर येथे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक खारघर येथे पार पडली. परंतु हा सोहळा किती तारखेला निश्चित केला जातोय, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली नाही. प्रधानमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतीही निश्चित तारीख न कळाल्याने नवी मुंबई पोलीस, सिडको मंडळ आणि रायगड जिल्हा प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत १४ ऑक्टोबर (सर्वपित्री अमावस्या) किंवा १५ ऑक्टोबर (नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी) हा सोहळा होईल, असा अंदाज बांधून या बैठकीत नियोजन केले जात आहे. नवी मुंबई मेट्रोतून गारेगार प्रवास सुरु करण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न खारघर, तळोजावासियांचे यानिमित्ताने पुर्ण होणार आहे.
सिडको महामंडळाने नवी मुंबईतील प्रवाशांना दळणवळणासाठी पर्याय म्हणून मेट्रो प्रकल्प हाती घेतला. मागील ८ वर्षांपासून या मेट्रो मार्गिकेचे काम बेलापूर, खारघर, तळोजा या दरम्यान सुरु आहे. दररोज ९८ हजार प्रवासी या मेट्रोतून प्रवास करतील असा अंदाज सिडको मंडळाच्या परिवहन विभागाने बांधून मेट्रोच्या कामाला सूरुवात केली. सिडको मंडळ बेलापूर ते तळोजा या मार्गावर पहिली मेट्रो धावणार आहे. सिडको मंडळाला या प्रकल्पासाठी ३०६३ कोटी ६३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. काम पुर्ण झाल्यानंतर आतापर्यंत २९५४ कोटी रुपये खर्च प्रत्यक्षात झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सप्टेंबर २०१९ ला या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. त्यावेळेस लोकेश चंद्र हे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक होते.
त्यानंतर डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक हे पद आल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत मेट्रो प्रकल्पाची विविध कामे मार्गी लागली. डॉ. मुखर्जी यांनी २०२१ मध्ये जाहीर केल्याप्रमाणे १० किलोमीटरच्या प्रवासासाठी ४० रुपये तिकीटभाडे प्रवाशांना मोजावे लागणार होते. यामधील पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० तसेच २ ते ४ किलोमीटरसाठी १५ रुपये आणि ४ ते ६ किलोमीटरसाठी २० रुपये आणि ६ ते ८ किलोमीटरसाठी २५ रुपये तसेच ८ ते १० या पल्यासाठी ३० रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. या तिकीट भाड्यात दोन वर्षांनी काही दरवाढ सिडको मंडळ करणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागणार आहे. मेट्रोचा गारेगार प्रवास कमीतकमी ३२ किलोमीटर ते ८५ किलोमीटर प्रती तास वेगाने असणार आहे. एकावेळेला ११२५ प्रवासी यामधून प्रवास करु शकतील.
हेही वाचा : पनवेल मुंबई लोकलची गती मंदावली, हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे प्रवाशांचे हाल
एकावेळी दिडशे प्रवासी बसून आणि ९७५ प्रवासी उभे राहून प्रवास करु शकतील. उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या मेट्रो मार्गावरील बेलापूर, खारघर ते तळोजा या वसाहतीमधील मेट्रो स्थानकांची अंतिम टप्प्यातील रंगरंगोटी, स्वच्छता व सफाईचे कामे सुरु आहेत. बेलापूर ते तळोजा ही मेट्रो मार्गिका सुरु होत असल्याने खारघर आणि तळोजा येथील बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. तळोजा ते कल्याण या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेच्या कामाला राज्य सरकारने प्राधान्य दिल्याने कल्याणच्या प्रवाशांना थेट बेलापुरला काही मिनिटांत पोहोचता येईल.
हेही वाचा : माजी महापौर सागर नाईक यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे उकळण्याचे प्रकार; पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या आणि राईट्स यांनी विधिग्राह्य केलेल्या नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर (डीपीआर) आधारित बेलापूर- खारघर – पेंधर- तळोजा एमआयडीसी – कळंबोली – खांदेश्वर या एकूण २६.२६ कि.मी.या उन्नत मार्गाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत (नमुंआंवि) विस्तार करावयाचा असून तो ४ टप्प्यांत (चार मार्गिका) करण्यात येणार आहे.
हेही वाचा : नवी मुंबईतील विकासकामांवरून शिंदे गटाची नाईकांवर आगपाखड; झोपडपट्टी पूनर्विकासावरून तणाव वाढला
नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग १ प्रकल्प:
• पहिल्या टप्प्यात, सिडकोने नवी मुंबई मेट्रो रेल्वे लाईन १ (बेलापूर ते पेणधर) या ११.१० किमी लांबीचा उन्नत मार्ग ज्यामध्ये ११ स्थानके आणि तळोजा येथे मेट्रोशेड (एक आगार) याची उभारणी केली आहे.
• या मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार – मेसर्स लुईस बर्जर ग्रुप आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा- मेट्रो) हे आहेत.
• आरडीएसओ (रेल्वे मंत्रालयांतर्गत रिसर्च डिझाईन ॲन्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशन) द्वारे दोलन चाचण्या (ऑसिलेशन ट्रायल), इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टन्स चाचणी इ. चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या असून आरडीएसओतर्फे ऑक्टोबर २०२१ मध्ये तात्पुरते गती प्रमाणपत्र मिळाले आहे.
• मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता २९ मार्च २०२२ रोजी परवानगी मिळाली.
हेही वाचा : मच्छीमार खर्चाच्या जाळ्यात; ग्राहक महागाईच्या लाटेत!
प्रस्तावित मेट्रो प्रकल्प
- नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग – २, ३ आणि ४ प्रकल्प
- मार्ग क्रमांक २ – तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर (अंतर ७.१२ कि. मी.) स्थानके – ६
- मार्ग क्रमांक ३ – पेंधर ते तळोजा एमआयडीसी (अंतर ३.८७ कि. मी.) स्थानके – ३
- मार्ग ४ – खांदेश्वर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अंतर ४.१७ कि. मी.) स्थानके – १
प्रस्तावित मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्रमांक २, ३ आणि ४ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सिडको संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र शासनाकडून व केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सिडको संचालक मंडळात अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नाही.